जळगाव - कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावमुळे न्यायालयांच्या कामकाजावरही प्रभाव पडला आहे. प्रवासी वाहतूक बंद असल्याने अनेक खटल्यांतील वादी-प्रतिवादी न्यायालयात उपस्थित राहू शकत नाहीत. यावर पर्याय म्हणून जळगावच्या कौटुंबीक न्यायालयाने व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून सुनावणी घेत एका दाम्पत्याच्या घटस्फोटाच्या खटल्यावर निर्णय दिला. या प्रकरणातील पत्नीने थेट मलेशियातून व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून न्यायालयात जबाब दिला. लॉकडाऊन काळात अशा प्रकारे सुनावणी होऊन घटस्फोट घेतल्याची दुसरी घटना ही जळगावात घडली आहे.
सन २०१८ मध्ये पुण्यातील मुलगी व जळगावातील मुलगा यांचा विवाह झाला होता. विवाहानंतर दोनच महिन्यात या दोघांमध्ये मतभेद सुरू झाले. दोघांना एकमेकांचे विचार पटत नव्हते. अखेर या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मुलगी पुण्याला आई-वडिलांकडे निघून गेली. दोघांनी विचार करून समन्वयाने घटस्फोट घेण्याचे ठरवले होते. त्यानुसार जून २०१९ मध्ये कौटुंबीक न्यायालयात हे प्रकरण सुनावणीसाठी ठेवण्यात आले. तत्पूर्वी पुण्यात आई-वडिलांकडे राहणारी मुलगी नोकरीच्या निमित्ताने मलेशिया या देशात निघून गेली.
सुरुवातीला पती-पत्नी या दोघांचे समुपदेशन करण्यात आले. विधिज्ज्ञ, न्यायालयाने त्यांना घटस्फोट न घेण्याचा सल्लाही दिला. परंतु, दोघेही घटस्फोट घेण्यावर ठाम होते. न्यायाधीश रितेश लिमकर यांच्या न्यायालयात हे प्रकरण सुनावणीसाठी आले. नेमके याचवेळी कोरोनाचा संसर्ग वाढल्याने जगभरात लॉकडाऊन सुरू झाले. त्यामुळे मलेशियात गेलेल्या मुलीला न्यायालयात हजर राहणे शक्य झाले नाही.
अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार दोन्ही पक्षांच्या संमतीने व्हिडिओ कॉलिंगवर सुनावणी घेण्यास सुरुवात झाली. दोन वेळा सुनावणी घेऊन दोघांचे जबाब नोंदवण्यात आले. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर बुधवारी न्यायालयीन प्रक्रिया आटोपली. त्यानंतर गुरुवारी दोघांमध्ये परस्पर समन्वयातून घटस्फोट झाल्याचा निकाल न्यायालयाने दिला. अॅड. ज्योती भोळे यांनी या खटल्याचे संपूर्ण कामकाज पाहिले.