जळगाव - जळगाव पोलिसांनी सव्वालाखांची बनावट तंबाखू पकडल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सनी टेकचंद पंजाबी (वय ३२, रा. सिंधी कॉलनी, पाचोरा) असे या आरोपीचे नाव आहे.
आरोपीविरोधात गुन्हा दाखल
आरोपी हा बनावट तंबाखूची तस्करी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार आरोपीला पकडण्यासाठी इच्छादेवी चौकात नाकाबंदी करण्यात आली. काही वेळातच या ठिकाणी एक मालवाहू रिक्षा ( क्र. एमएच १९ सीवाय ००८९) आली. पोलिसांनी या रीक्षाला अडवून तपासणी केली असता, त्यामध्ये बनावट तंबाखूची पाकिटे आढळून आली. पोलिसांनी ही पाकीटे जप्त केली असून, आरोपीविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या बनावट तंबाखूच्या पाकीटांवर एका अधिकृत तंबाखूचे उत्पादन करणाऱ्या कंपनीचा पत्ता छापलेला होता, पोलिसांनी याबाबत कंपनीच्या मार्केटिंग सुपरवायझर यांच्याशी संपर्क साधला असता, ही पाकिटे बनावट असल्याचे निष्पन्न झाले.