जळगाव - यंदा मान्सूनचे आगमन गेल्या वर्षाच्या तुलनेत जरा लवकर होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. त्यादृष्टीने शेतकऱ्यांनी देखील खरीप हंगामाची तयारी सुरु केली आहे. यंदा जिल्ह्यात गेल्या वर्षाच्या तुलनेत खरिपाच्या पेरणीत ४ ते ५ टक्के वाढ होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
गतवर्षीच्या तुलनेत पावसाची टक्केवारी यंदाही चांगली राहणार असल्याचा अंदाज असल्याने कृषी विभागाने खरीप हंगामासाठी पीक, पेरणी, बी-बियाणे आणि खतांचे नियोजन पूर्ण केले आहे. गेल्या वर्षी जून ते ऑक्टोबर या काळातील ५५ दिवसांत १४४ टक्के पाऊस झाला होता. शिवाय नोव्हेंबर महिन्यात देखील पाऊस झाला होता.
यंदाही ९५ टक्के पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला असल्याने कृषी विभागाने खरिपाच्या नियोजनात लागवडीखालील क्षेत्रात ५ टक्के वाढ केली आहे. खरिपासाठी यंदा ७ लाख ७५ हजार ५५० हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन आहे. जिल्ह्यात एकूण लागवडीखालील क्षेत्र ८ लाख १० हजार ५०७ हेक्टर एवढे आहे. दरवर्षी, सरासरी ७ लाख ५० हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी होत असते.
५ लाख हेक्टरवर होणार कापसाची पेरणी-
जिल्ह्यात खरिपाचे मुख्य पीक हे कापसाचेच आहे. गेल्यावर्षी जिल्ह्यात ५ लाख १० हजार ९११ हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली होती. यंदा त्यात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता असून, यावर्षी ५ लाख २५ हजार क्षेत्रावर कापसाची लागवड होण्याचा अंदाज आहे. यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत बोंडअळीचे प्रमाण कमी राहणार आहे. त्यामुळे कापसाच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे.
कर्जपुरवठा कमी झाल्याने होणार परिणाम-
यंदा खरिपाच्या क्षेत्रात अजून काही प्रमाणात वाढ झाली असती मात्र, पीककर्ज पुरवठा चांगल्या प्रकारे न झाल्याने त्याचा परिणाम खरीपाच्या लागवडीवर होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात कर्जपुरवठ्यासाठी २ हजार ९२७ कोटींचा आराखडा असताना केवळ २८२ कोटींचे वाटप झाले आहे. यंदा लॉकडाऊन झाल्यामुळे रब्बीच्या मालाची खरेदी अद्याप झालेली नाही. गेल्या वर्षाचा कापूस अजूनही शेतकऱ्यांचा घरात पडून आहे. अशा परिस्थितीत कर्जाचा पुरवठा न झाल्यास शेतकऱ्यांना खरिपाची तयारी करण्यास आर्थिक अडचणी निर्माण होवू शकतात.
तृणधान्याचे क्षेत्र वाढणार-
यंदाच्या खरीप नियोजनानुसार मका, तूर, मूग, उडीद व सोयाबीन या पिकांखालील क्षेत्रात घट तर ज्वारी व बाजरी या पिकांखालील क्षेत्रात वाढ होणार आहे. गेल्या वर्षीच्या खरिपाच्या तुलनेत यंदा तृणधान्याच्या पेरणीत वाढ होणार आहे. सोयाबीनचे बियाणे देखील भरपूर आहे. लष्करी बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी शासनाने जूनच्या पहिल्या आठवड्यानंतर पेरणी करण्याचा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकर पेरणी करू नये, असे आवाहन कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे.