जळगाव - जिल्ह्यात कोरोनातून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 75.04 टक्क्यांवर पोहोचले आहे. जिल्ह्यात सध्या 9 हजार 860 ॲक्टीव्ह रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत असून त्यापैकी 3 हजार 494 रुग्ण गृह अलगीकरणात आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आतापर्यंत 1 लाख 83 हजार 808 संशयित रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली असून ॲक्टिव्ह रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस कमी होत आहे. ही जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली.
जिल्ह्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी दैनंदिन चाचण्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढविण्यात आली असून लक्षणे जाणवताच नागरिकांनी तपासणी करुन घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. सध्या जिल्ह्यात आरटी-पीसीआरद्वारे 86 हजार 926 तर रॅपिड ॲन्टीजेन टेस्टद्वारे 96 हजार 882 अशा एकूण 1 लाख 83 हजार 808 तपासण्या करण्यात आल्या आहेत. यापैकी 1 लाख 38 हजार 63 चाचण्या निगेटिव्ह तर 43 हजार 897 चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असून इतर अहवालांची संख्या 1 हजार 88 असून 760 अहवाल प्रलंबित आहेत.
जिल्ह्यात सध्या 9 हजार 860 बाधित रुग्ण उपचार घेत असून त्यापैकी कोविड केअर सेंटरमध्ये 4 हजार 890 रुग्ण, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये 807, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये 669 रुग्ण उपचार घेत आहेत. तर 3 हजार 494 रुग्ण गृह अलगीकरणात उपचार घेत आहेत. शिवाय विलगीकरण कक्षातही 438 रुग्ण आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये लक्षणे नसलेले 8 हजार 384 रुग्ण असून लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या 1 हजार 476 इतकी आहे. यापैकी 669 रुग्णांना ऑक्सिजन वायू सुरु असून 287 रुग्ण हे आयसीयुमध्ये दाखल आहे.
जिल्ह्यात आतापर्यंतच्या बाधित रुग्णांची संख्या 43 हजार 897 इतकी झाली आहे. यापैकी 32 हजार 941 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात आतापर्यंत 1 हजार 96 रुग्णांचा मृत्यु झाला आहे. जिल्ह्यातील बाधित रुग्णांचा मृत्युदर हा 2.50 टक्क्यांपर्यंत खाली आणण्यात प्रशासनास यश आले आहे. जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती हाताळण्यासाठी सीसीसी व इतर रुग्णालयांमध्ये 12 हजार 854 इतके बेड आहेत. यात 263 आयसीयू बेड तर 1 हजार 643 ऑक्सिजनयुक्त बेडचा समावेश आहे.
जिल्ह्यात तालुकानिहाय आतापर्यंत आढळून आलेले बाधित रुग्ण:
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 43 हजार 897 इतकी झाली आहे. यामध्ये जळगाव शहर 9814, जळगाव ग्रामीण 2238, भुसावळ 2689, अमळनेर 3836, चोपडा 3686, पाचोरा 1707, भडगाव 1698, धरणगाव 1951, यावल 1447, एरंडोल 2623, जामनेर 3099, रावेर 1808, पारोळा 2235, चाळीसगाव 2844, मुक्ताईनगर 1180, बोदवड 708, दुसऱ्या जिल्ह्यातील जळगाव जिल्ह्यात असलेल्या 334 रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात तालुकानिहाय आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांची संख्या:
जळगाव शहर 6799, जळगाव ग्रामीण 1431, भुसावळ 1898, अमळनेर 3030, चोपडा 2409, पाचोरा 1539, भडगाव 1491, धरणगाव 1552, यावल 1162, एरंडोल 1846, जामनेर 2396, रावेर 1320, पारोळा 1709, चाळीसगाव 2495, मुक्ताईनगर 1122, बोदवड 524, इतर जिल्ह्यातील 218 याप्रमाणे आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 32 हजार 941 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहे.
जिल्ह्यात तालुकानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या:
जिल्ह्यात सध्या उपचार घेत असलेले 9 हजार 860 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये जळगाव शहर 2786, जळगाव ग्रामीण 733, भुसावळ 669, अमळनेर 716, चोपडा 1209, पाचोरा 102, भडगाव 167, धरणगाव 353, यावल 233, एरंडोल 736, जामनेर 637, रावेर 406, पारोळा 509, चाळीसगाव 282, मुक्ताईनगर 32, बोदवड 174, दुसऱ्या जिल्ह्यातील जळगाव जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या 116 रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात तालुकानिहाय उपचारादरम्यान मृत्यु झालेल्या रुग्णांची संख्या:
जिल्ह्यात आतापर्यंत उपचारादरम्यान 1 हजार 96 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यु झाला आहे. यामध्ये जळगाव शहर 229, जळगाव ग्रामीण 74, भुसावळ 122, अमळनेर 90, चोपडा 68, पाचोरा 66, भडगाव 40, धरणगाव 46, यावल 52, एरंडोल 41, जामनेर 66, रावेर 82, पारोळा 17, चाळीसगाव 67, मुक्ताईनगर 26, बोदवड 10 मृतांचा समावेश आहे. उपचारादरम्यान एकूण मृत्यु झालेल्या 1 हजार 96 रुग्णांपैकी 956 मृत्यु हे 50 पेक्षा जास्त वयोगटातील असून 508 मृत्यु हे आजारपण असलेले आहेत.
जिल्ह्यात 5 हजार 22 ठिकाणे प्रतिबंधित क्षेत्र:
कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला भागाचे निर्जंतुकीकरण करणे तसेच रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती शोधून त्यांची तपासणी करण्यासाठी हा भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येतो. त्यानुसार जिल्ह्यात आतापर्यंत 5 हजार 22 ठिकाणे ही प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील 2 हजार 279, शहरी भागातील 1 हजार 280 तर जळगाव महापालिका क्षेत्रातील 1 हजार 463 ठिकाणांचा समावेश आहे. या क्षेत्रांचे सर्व्हेक्षण करण्यासाठी 6 हजार 236 टिम कार्यरत आहे. या क्षेत्रात 2 लाख 54 हजार 476 घरांचा समावेश असून यात 11 लाख 10 हजार 910 इतकी लोकसंख्येचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली.