जळगाव - 'समाजाचे आपण काही देणं लागतो', या उदात्त भावनेतून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जळगावातील सुवर्ण व्यावसायिक रतनलाल सी. बाफना यांनी मुख्यमंत्री सहायता निधीला 5 लाखांची मदत केली आहे. त्यांच्या सेवाभावी वृत्तीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
सध्या जगभरात कोरोना विषाणूचा धुमाकूळ सुरू आहे. भारतातही कोरोना हळूहळू पाय पसरत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारकडून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, या कामी केवळ केंद्र व राज्य सरकारने पावले उचलणे अपेक्षित नाही, तर देशसेवा म्हणून प्रत्येकाने सरकारच्या मदतीसाठी पुढे येणे आवश्यक आहे. केंद्र व राज्य सरकारच्या बरोबरीने कोरोना लढा देता येऊ शकतो, याच भावनेतून त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीला आपल्यावतीने पाच लाख रुपयांची मदत केली.
मदतीची रक्कम गुरुवारी दुपारी मुख्यमंत्री सहायता निधीसाठीच्या बँक खात्यात आरटीजीएसद्वारे जमा करण्यात आली आहे. शाकाहार प्रणेते असलेले बाफना आपल्या सेवाभावी स्वभावाने ओळखले जातात. कोरोनाच्या नियंत्रणासाठी समाजातील प्रत्येक घटकाने सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, असे आवाहनदेखील त्यांनी यानिमित्ताने केले.