जळगाव - कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत राज्यात चर्चेत असलेल्या जळगाव जिल्ह्यात संसर्गाची स्थिती आता नियंत्रणात आली आहे. दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील 15 तालुक्यांमध्ये एका दिवसाला दीड ते दोन हजारांवर रुग्ण आढळत होते. मात्र, आता हीच संख्या अवघ्या दोन आकड्यांवर आली आहे. कधी कधी तर हीच रुग्णसंख्या एक आकडी असते. सद्यस्थितीत जिल्ह्यातील सक्रिय रुग्ण हे 100 असून त्यात लक्षणे असलेले रुग्ण केवळ 28 इतके आहेत.
जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेच्या सामूहिक प्रयत्नांचे यश -
कोरोनाच्या घटलेल्या रुग्णसंख्येबाबत बोलताना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले की, कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर जिल्ह्यात दररोज एक ते दीड हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत होते. मात्र, तब्बल अडीच ते तीन महिन्यांनी हे चित्र बदलत आहे. आता दररोज आढळून येणाऱ्या बाधित रुग्णांची संख्या अवघी दोन आकडी इतकी खाली आली आहे. अनेक तालुक्यात तर एकही रुग्ण आढळत नाही. हे खऱ्या अर्थाने आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा प्रशासनाच्या सामूहिक प्रयत्नांचे यश आहे. मार्च महिन्यानंतर पहिल्यांदा जिल्ह्यातील ऍक्टिव्ह रुग्णसंख्या ही घटून शंभरापर्यंत आली आहे. पॉझिटिव्हिटी रेट देखील घसरला असून, रिकव्हरी रेट तर 98.12 टक्के आहे. कोरोना नियंत्रणात असला तरी संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंट या त्रिसूत्रीवर आपले काम सुरूच राहणार आहे, असेही जिल्हाधिकारी राऊत म्हणाले.
आरोग्य यंत्रणेवरील ताण काही अंशी ओसरला -
जिल्ह्यात सध्या बहुतांश तालुक्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण झपाट्याने कमी होत आहे. काही तालुक्यातील दैनंदिन अहवाल तर निरंक येत आहेत. कडक निर्बंधांचा सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे. काही महिन्यापूर्वी अनेक रुग्णालयांमध्ये बेड शिल्लक नव्हते. त्यामुळे अनेक रुग्ण उपचारासाठी मुंबई, पुणे यासारख्या शहरांमध्ये धाव घेत होते. मात्र, सध्या हे चित्र बदलले आहे. बहुतांश रुग्णालयांमधील बेड रिक्त आहेत. ऑक्सिजन आणि औषधी टंचाईची समस्या देखील निकाली निघाली आहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्या कमी झाली असली तरी जबाबदारी मात्र, कायम आहे. रुग्णसंख्येचा आलेख असाच कमी करण्यासाठी प्रत्येकाने कोरोनाची नियमावली काटेकोरपणे पाळणे अपेक्षित आहे, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.
असा होता जळगाव पॅटर्न-
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील परिस्थिती हाताबाहेर गेली होती. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तातडीने आवश्यक त्या उपाययोजना केल्या. ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंट या त्रिसूत्रीचा अवलंब केला. विशेष म्हणजे, कोरोनाच्या चाचण्या वाढवल्या. पूर्वी दिवसाला 5 ते 6 हजार चाचण्या व्हायच्या. त्या वाढवून 12 ते 14 हजारांपर्यंत केल्या होत्या. यातून बाधित रुग्ण लवकर समोर येऊन त्यांच्यावर वेळीच उपचार झाले. त्यामुळे साखळी खंडित होऊन पॉझिटिव्हिटी घटण्यास मदत झाली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रशासनाने हॉटस्पॉट लक्ष्य केले. त्याठिकाणी कंटेंटमेंट झोन, तपासणी आणि उपचाराची सुविधा वाढवली. यामुळे कोरोनाला रोखणे शक्य झाले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 14 लाख कोरोना टेस्ट-
कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी जिल्ह्यात आवश्यकतेनुसार कोरोना संशयितांच्या चाचण्या करण्यात आल्या. जिल्ह्यात आतापर्यंत करण्यात आलेल्या 14 लाख 223 व्यक्तींच्या कोरोना चाचण्यांपैकी 9 लाख 28 हजार 236 व्यक्तींची रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट करण्यात आल्या. यापैकी 84 हजार 732 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. 4 लाख 71 हजार 987 व्यक्तींची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली असून यापैकी 57 हजार 820 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. तसेच 1 हजार 904 इतर अहवाल आढळले. सध्या 308 अहवाल प्रलंबित असल्याची माहिती आरोग्य यंत्रणेकडून मिळाली.
कोरोनाची आकडेवारी -
- जिल्ह्यातील एकूण आतापर्यंतची रुग्णसंख्या- 142552
- आतापर्यंत एकूण बरे झालेले रुग्ण- 139877
- रिकव्हरी रेट- 98.12 टक्के
- मृत्यूदर- 1.81 टक्के
- ऍक्टिव्ह रुग्णसंख्या- 100
- लक्षणे असलेले रुग्ण- 28
- लक्षणे नसलेले रुग्ण- 72
- होम आयसोलेशनमधील रुग्ण- 72
- 'सीसीसी'मधील रुग्ण- 0
- विलगीकरणातील रुग्ण- 28
- 'डीसीएचसी'मधील रुग्ण- 20
- 'डीसीएच'मधील रुग्ण- 8
- ऑक्सिजनवरील रुग्ण- 18
- आयसीयूतील रुग्ण- 8