जळगाव - जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. दररोज शेकडोंच्या संख्येने नवे पॉझिटिव्ह रूग्ण समोर येत आहेत. अशी परिस्थिती असताना जळगावकर मात्र, स्वतःच्या आरोग्याच्या बाबतीत कमालीचे बेफिकीर असल्याचे पहायला मिळत आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती, भाजीमंडई, किराणा मालाच्या बाजारपेठेत दररोज हजारोंच्या संख्येने गर्दी उसळत आहे. व्यापारीच नाही तर ग्राहकांना देखील फिजिकल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, निर्जंतुकीकरण अशा खबरदारीच्या उपाययोजनांचे गांभीर्य नसल्याची धक्कादायक बाब 'ईटीव्ही भारत'ने शनिवारी केलेल्या पाहणीत समोर आली.
महाराष्ट्रात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर जळगाव जिल्ह्यात एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला कोरोनाचा पहिला रूग्ण आढळला होता. त्यानंतर कोरोनाचा संसर्ग अतिशय वेगाने सुरू आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत सात हजारांपेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. कोरोनाचा प्रमुख हॉटस्पॉट असलेल्या जळगाव शहरात 1 हजार 800 रूग्ण आहेत. कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनासह स्थानिक प्रशासनाने वेळोवेळी लॉकडाऊन जाहीर केले. स्थानिक पातळीवर प्रशासनाकडून अनेक उपाययोजना करण्यात आल्या. परंतु, कोरोनाचा संसर्ग रोखण्यात अपयश येत आहे. याच पार्श्वभूमीवर 'ईटीव्ही भारत'ने जळगाव शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती संचलित फळे व भाजीपाला मार्केट, दाणा बाजार तसेच आठवडे बाजारात पाहणी केली. जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव वेगाने होत असतानाही गर्दी होणाऱ्या ठिकाणी खबरदारी घेतली जात नसल्याचे चित्र दिसून आले. लोकांच्या हलगर्जीपणामुळेच कोरोना हातपाय पसरत असल्याची स्थिती आहे.
फळे व भाजीपाला मार्केटमध्ये सर्वाधिक धोका -
जळगाव शहरात कृषी उत्पन्न बाजार समिती संचलित फळे व भाजीपाला मार्केट आहे. जळगावसह राज्यातील इतर जिल्हे आणि परराज्यातून या ठिकाणी फळे तसेच भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणावर आवक होते. या मार्केटमध्ये दीडशेहून अधिक नोंदणीकृत व्यापारी आणि आडते आहेत. दररोज पहाटे 5 वाजेपासून मालाचा जाहीर लिलाव केला जातो. पहाटे 5 ते सकाळी 10 वाजेपर्यंत लिलाव सुरू असतो. जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झालेला असताना मार्केटमध्ये दररोज शेतकरी, व्यापारी, आडते तसेच माल घेणारे किरकोळ विक्रेते यांची हजारोंच्या संख्येने गर्दी उसळत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होते. अनेक व्यापारी तसेच ग्राहक तोंडावर मास्क देखील बांधत नाहीत. मालाचा लिलाव करताना व्यापारी आणि शेतकरी एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखत नाहीत. त्यामुळे या ठिकाणी जर कुणी कोरोनाबाधित व्यक्ती असली तर त्यामुळे संसर्ग बळावण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
बाजार समिती प्रशासन म्हणते, गर्दीवर नियंत्रण ठेवणे शक्य नाही -
फळे व भाजीपाला मार्केटमध्ये दररोज उसळणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवणे शक्य नसल्याचे कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाचे म्हणणे आहे. या ठिकाणी लिलावावेळी होणारी गर्दी पाहता जिल्हा प्रशासनाने यापूर्वी दोनवेळा बाजार समितीच बंद ठेवली होती. मात्र, शेतीमाल हा नाशवंत असल्याने, शिवाय हातावर पोट असणाऱ्या लोकांचे हाल पाहता बाजार समिती जास्त दिवस बंद ठेवणे शक्य नव्हते. त्यामुळे प्रशासनाने बाजार समितीत सशर्त लिलाव सुरू केले. मात्र, या ठिकाणी परिस्थिती पुन्हा एकदा जैसे थे झाली असून, प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. बाजार समितीकडे गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक तेवढे मनुष्यबळ नाही. अनेकवेळा सूचना देऊनही लोक नियम पाळत नाहीत. सर्वांवर कारवाई करणे शक्य नाही. मध्यंतरी बाजार समिती प्रशासनाने फिजिकल डिस्टन्सिंग, सॅनिटायझेशन अशा उपाययोजनांसाठी 5 सदस्यीय समिती स्थापन केली होती. मात्र, अवघ्या दीड महिन्यातच ही समिती गायब झाली आहे. बाजारात येणारे व्यापारी, आडते, शेतकरी तसेच किरकोळ विक्रेत्यांसाठी प्रवेशद्वारावर थर्मल स्क्रिनिंग, सॅनिटायझरची व्यवस्था केल्याचा बाजार समिती प्रशासनाचा दावा आहे. प्रत्यक्षात मात्र ते कुठेही नजरेस पडत नाही. गर्दी टाळण्यासाठी नोंदणीकृत व्यापारी, आडते यांना सुरुवातीला ओळखपत्रे देण्यात आली, पण कुणाच्याही गळ्यात ते दिसत नाही.
दाणा बाजारातही नियम धाब्यावर -
शहरातील दाणा बाजारात किराणा मालाच्या घाऊक व किरकोळ विक्रीची सुमारे दीडशे ते दोनशे दुकाने आहेत. दाणा बाजार जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. याठिकाणी दररोज हजारोंच्या संख्येने लोक किराणा मालाच्या खरेदीसाठी येतात. येथेही नियमांचे पालन होत नसल्याचे पहायला मिळाले. मोजके दुकानदार सोडले तर अनेक जण सॅनिटायझर वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे, असे साधे नियमही पाळत नाहीत. खरेदीसाठी येणारे अनेक ग्राहकही तोंडाला मास्क लावत नाहीत. दाणा बाजारात माल खाली करण्यासाठी अवजड वाहने येत असल्याने वाहतूक कोंडी होते. लोकांची गर्दी आणि वाहतूककोंडी पाहून प्रशासनाने आता हे क्षेत्र 'नो व्हेईकल झोन' म्हणून घोषित केले आहे. फिजिकल डिस्टन्सिंग न पाळणाऱ्या दुकानदारांवर सुरुवातीला पालिकेने कारवाई केली मात्र, आता तर कारवाईची मोहिमही थंडावली आहे. दरम्यान, शहरातील भाजीबाजारातही यापेक्षा वेगळी स्थिती नाही.