जळगाव - जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल असलेल्या ३२ वर्षीय कोरोनाबाधित महिलेने गुरुवारी रात्री दोन जुळ्या मुलांना जन्म दिला. खबरदारी म्हणून दोन्ही नवजात अर्भकांना आईपासून लगेच वेगळे करण्यात आले. त्यामुळे बाळांची आईपासून ताटातूट झाली आहे. जन्म झालेल्या अर्भकांमध्ये मुलगा आणि एक मुलीचा समावेश आहे.
भुसावळ शहरातील रहिवासी असलेली ३२ वर्षीय गरोदर महिला काही दिवसांपूर्वी जिल्हा रुग्णालयात कोरोना संशयित म्हणून दाखल होती. २० मे रोजी तिचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तिच्यावर कोविड कक्षात उपचार सुरू होते. गुरुवारी रात्री तिने जुळ्या बाळांना जन्म दिला. जुळ्यांमधील एकाचे वजन अडीच किलो तर दुसऱ्याचे सव्वादोन किलो आहे. या महिलेचे प्रसूती सिझेरीयन पद्धतीने करण्यात आली. डॉ. श्रीकृष्ण चव्हाण आणि भूलतज्ज्ञ डॉ.संदीप पटेल यांनी ही प्रसूती केली. महिला आणि बाळांची प्रकृती ठणठणीत आहे.
कोरोना तपासणीसाठी बाळांचे घेतले स्वॅब -
महिलेने मुलांना जन्म दिल्यानंतर त्यांना तिच्यापासून वेगळे करण्यात आले आहे. आज सकाळी बाळांच्या लाळेचे नमुने घेण्यात आले आहे. महिला पॉझिटिव्ह असल्याने बाळांनाही जन्मत:च कोरोना आहे किंवा नाही? याची खात्री करण्यासाठी हे नमुने घेण्यात आल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीक्षक डॉ. किरण पाटील यांनी सांगितले.