जळगाव - दिवाळीनंतर जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग काही प्रमाणात वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दररोज दोन आकडी संख्येने नवीन रुग्ण समोर येत आहेत. कोरोनाचा जिल्ह्यातील रिकव्हरी रेट आता 96 टक्क्यांच्या पुढे गेला असला तरी मृत्यूदर मात्र आटोक्यात येत नसून, तो पूर्वीप्रमाणे 2.38 टक्क्यांवर कायम आहे. एकूणच जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे निरीक्षण आरोग्य यंत्रणेने नोंदवले आहे. गेल्या आठवडाभरात जिल्ह्यात 292 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून, 12 रुग्णांचा बळीही गेला आहे. दरम्यान, कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क असली तरी नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे.
जळगाव जिल्ह्यात मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर एप्रिल महिन्यात संसर्ग आटोक्यात होता. परंतु, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून ते ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला. कोरोनाने अक्षरशः थैमान घातले होते. पुढे सप्टेंबर महिन्यात संसर्गाचा वेग काहीसा आटोक्यात आला. ऑक्टोबरच्या प्रारंभी संसर्गाचा वेग कमी होता. परंतु, नवरात्रौत्सव, दसरा आणि त्यानंतर आलेली दिवाळी या सणांच्या काळात राज्य शासनाने टाळेबंदीत काहीअंशी शिथिलता प्रदान केल्याने नागरिकांची 'मूव्हमेंट' वाढली. आता त्यामुळेच जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे दिसून येत आहे.
नागरिकांचा हलगर्जीपणा कारणीभूत?
जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला होता. परंतु, सणासुदीच्या काळात नागरिकांनी हलगर्जीपणा केल्याने संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. दसरा आणि दिवाळीच्या अनुषंगाने बाजारपेठेत तोबा गर्दी उसळली होती. आजही बाजारपेठेतील गर्दी नियंत्रित नाही. त्यामुळे कोरोनाचे नवीन रुग्ण समोर येत असल्याचा अंदाज आरोग्य यंत्रणेने वर्तवला आहे. नागरिकांच्या हलगर्जीपणामुळेच ही परिस्थिती उद्भवली आहे, असे आरोग्य यंत्रणेच्या तज्ञांचे मत आहे.
अशी आहे जिल्ह्यातील परिस्थिती-
सध्या जळगाव जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या 53 हजार 989 इतकी झाली आहे. यातील 52 हजार 330 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. चिंतेची बाब म्हणजे, यात 1 हजार 286 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा रिकव्हरी रेट 96.93 टक्के इतका समाधानकारक आहे. परंतु, मृत्यूदर 2.30 टक्के असून, तो कमी न होता कायम आहे. कायम असलेला मृत्यूदर ही बाब आरोग्य यंत्रणेसाठी आव्हान ठरत आहे.
आठवडाभरात वाढले 292 रुग्ण-
दिवाळीनंतर जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग काही प्रमाणात वाढल्याचे चित्र आहे. गेल्या आठवडाभराचा विचार केला तर फक्त आठच दिवसात जिल्ह्यात तब्बल 292 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले आहेत. तर एकूण पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 349 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. पूर्वी नव्याने समोर येणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णसंख्येच्या तुलनेत कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असायची. परंतु, आता हे प्रमाण घसरले असून, पॉझिटिव्ह आणि बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जवळपास सारखीच किंवा आसपास असते. यावरून कोरोना संसर्गाचा वेग वाढल्याचे स्पष्ट होत आहे. गेल्या आठवडाभरात 12 रुग्णांचा मृत्यू देखील झाला आहे.
आरोग्य यंत्रणा दक्ष-
देशभरात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यातही मुंबई, पुण्यासह काही ठिकाणी कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या निर्देशानुसार, जळगाव जिल्ह्यात स्थानिक प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा दक्ष आहे. दुसरी लाट आलीच तर ऐनवेळी धावपळ उडू नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. कोविड सेंटर तसेच कोविड हॉस्पिटलमध्ये बेड्स तयार ठेवण्यात आले आहेत. इतर औषधे व साधनसामग्री देखील उपलब्ध असल्याची माहिती कोविड रुग्णालय प्रशासनाकडून अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
जिल्ह्यात उपलब्ध आहेत 13 हजार बेड्स-
जळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून आजमितीला 13 हजार बेड्स विविध हॉस्पिटल, कोविड सेंटर्समध्ये उपलब्ध आहेत. त्यात सीसीसी म्हणजेच, कोविड केअर सेंटर्समध्ये, 8 हजार 303, विलगीकरण सेंटर्समध्ये 2 हजार 376, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर्समध्ये 1 हजार 310 आणि डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल्समध्ये 1 हजार 7 बेड्सचा समावेश आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात आजच्या घडीला कोरोनाचे एकूण 373 इतके ऍक्टिव्ह रुग्ण आहे. ज्यात 204 रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत, तर 169 रुग्ण हे लक्षणे असलेले आहेत. त्यातील 80 रुग्ण हे ऑक्सिजनवर तर 38 रुग्ण हे अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत.
हेही वाचा - कोरोना वाढतोय... शाळा सुरू करण्याचा निर्णय विचारपूर्वक घ्या - देवेंद्र फडणवीस
हेही वाचा - देशातील रुग्णसंख्या 90 लाख 50 हजार; तर मृत्यू दर 1.47वर