जळगाव - सध्या जगभरात कोरोनाची दहशत पसरली आहे. कोरोनावरून जागतिक स्तरावर चीनबद्दल असंतोष व्यक्त केला जात असून यावरून जागतिक राजकारणही पेटले आहे. याच कोरोनाचा वापर आता ग्रामपंचायतीच्या राजकारणातही होऊ लागल्याचे चित्र जळगावमध्ये दिसून आले.
जिल्ह्यातील चिंचोली गावच्या सरपंचाच्या मुलाने गावातील १३ तरुण कोरोना रुग्णाच्या संपर्कात आले असून, त्यांना क्वारंटाईन करावे, अशी तक्रार आरोग्य प्रशासनाकडे केली. या तक्रारीवरून या सर्व तरुणांची यादी आरोग्यसेवक आणि आशा वर्कर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. या यादीतील सर्व तरुणांना आशा वर्करनी आरोग्य तपासणीसाठी फोन केले. मात्र, यामुळे हे सर्व तरूण दहशतीखाली गेले आहेत. आम्ही कुणाच्याच संपर्कात गेलो नसताना केवळ राजकीय सुडापोटी सरपंचाच्या मुलाने चुकीची तक्रार केली आहे, असे या तरुणांचे म्हणणे आहे. या प्रकरणाचा मानसिक त्रास होत असल्याने या तरुणांनी थेट पोलीस ठाणे गाठले आहे.
जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरू असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, चिंचोली गावात कोरोनाचा फायदा घेत सरपंचाच्या मुलाने आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला. यामुळे गावातील नागरिकांमध्ये सरपंच आणि त्याच्या कुटुंबाविरोधात असंतोष निर्माण झाला आहे. दरम्यान, याप्रकरणी १३ तरुणांनी जळगावचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना लेखी निवेदन दिले. खोटी माहिती पुरवून आपत्तीच्या काळात प्रशासनाची दिशाभूल करणाऱ्या सरपंचाच्या मुलावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.