जळगाव - तालुक्यातील शिरसोली गावात एकाच कुटुंबातील पाच जणांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये नवरदेवासह त्याचे वडील, भाऊ, भावजय व अन्य एका जणाचा समावेश आहे. लग्न सोहळा आटोपल्यानंतर चार दिवसांनी हा प्रकार समोर आल्याने, या लग्नाला हजेरी लावणाऱ्या वऱ्हाडीची झोप उडाली आहे.
लग्न आटोपल्यानंतर नवरदेवाला जाणवली लक्षणे
शिरसोली गावात 16 फेब्रुवारी रोजी एक विवाह सोहळा पार पडला. हा सोहळा आटोपल्यानंतर चार दिवसांनी नवरदेवाला कोरोनासदृश्य आजाराची लक्षणे जाणवू लागली. त्यानंतर नवरदेवाची कोरोनाचाचणी केली असता, त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर नवरदेवाचे वडील, भाऊ, भावजयी यांचीही कोरोना चाचणी करण्यात आली. त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, सर्वांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.
वऱ्हाडाची वाढली चिंता
या लग्नसोहळ्याला शेकडो जणांनी हजेरी लावली होती. त्यामुळे वऱ्हाडाची चिंता वाढली आहे. जिल्हा प्रशासनालादेखील आता बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांना शोध घेताना कसरत करावी लागणार आहे.
शिरसोलीत वाढतोय कोरोना
शिरसोली गावात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसात या गावात सात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.
बँकेचे 8 कर्मचारी बाधित
जळगाव शहरातील मध्यवर्ती भागात नेहरू चौकात असलेल्या आयडीबीआय बँकेतील आठ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे बँकेचे व्यवहार बंद ठेवून बँक सील करण्यात आली आहे. या घटनेमुळे बँक कर्मचारी तसेच ग्राहकांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून बँकेचे कामकाज थांबवले आहे. सोमवारी बँक सुरू ठेवण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार याबाबत निर्णय होईल. शाखा सुरू करण्याचा निर्णय झाला तर दुसऱ्या शाखेतील कर्मचारी या ठिकाणी नियुक्त केले जाणार आहेत, अशी माहिती बँकेचे व्यवस्थापक योगेश पाटील यांनी दिली आहे.