जळगाव - कोरोना विषाणूच्या संसर्गाने जगभरासह देशातही धुमाकुळ घालायला सुरूवात केली आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 15 हून अधिक संसर्ग झालेले तथा संशयित रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर 'कोरोना'चा जळगावात शिरकाव झाल्याची अफवा पसरली होती. या अफवेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, या विषयासंदर्भात ही केवळ अफवा आहे, अशी माहिती जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी ईटीव्ही भारत'ला दिली आहे. तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
जिल्ह्यातील भुसावळ येथील एका 12 वर्षीय मुलीला कोरोना सदृश्य आजाराची लक्षणे दिसून आल्याने उपचारासाठी जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी अफवा गुरुवारी रात्री पसरली होती. समाज माध्यमातून ही बातमी खूप व्हायरल झाली. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. यावृत्ताचे डॉ. खैरे यांनी खंडन केले आहे. कोरोना संशयित एकही रुग्ण आमच्याकडे दाखल नाही. ही अफवा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दक्षतेच्या सूचना आरोग्य यंत्रणेला केल्या आहेत. त्यानुसार, जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात विशेष कक्ष देखील स्थापन करण्यात आला आहे. नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, बाहेर पडताना तोंडाला स्वच्छ रुमाल किंवा मास्क बांधावे, वेळोवेळी हात स्वच्छ साबणाने किंवा सॅनिटायझरने धुवावेत, यामुळे कोरोनाचा प्रसार रोखता येईल, असेही आवाहन डॉ. खैरे यांनी केले.
हेही वाचा - गोंदियात कुक्कुटपालन व्यावसायिक बसले आमरण उपोषणाला
आरोग्य यंत्रणेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह -
दरम्यान, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे सक्त निर्देश असताना जळगाव जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा मात्र, गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. सिंधी बांधवांच्या जनेऊ संस्कार कार्यक्रमासाठी पाकिस्तानातून जळगावात तब्बल 41 नागरिक आले होते. मात्र, या 41 नागरिकांची कोरोना तपासणी करण्यात आलेली नाही. ही गंभीर बाब समोर आली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर परदेशी नागरिक आलेले असताना त्यांची आरोग्य तपासणी करण्याची तसदी जिल्हा रुग्णालय प्रशासन आणि महापालिका आरोग्य यंत्रणेनेसुद्धा घेतली नाही. यामुळे आरोग्य यंत्रणेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.