जळगाव- कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने देशभरात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद करण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत हातावर पोट असणाऱ्या लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. जळगाव शहरात संघटीत, असंघटीत क्षेत्रातील मजूर, बांधकाम कामगार, घरकाम करणारे मजूर, रिक्षा चालक अशा सुमारे 1 लाखांहून अधिक लोकांपुढे रोजीरोटीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
हेही वाचा- 'या' महामारीनंतरचे आर्थिक संकट उंबरठ्यावर आहे'
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदीमुळे कामधंदा ठप्प झाला आहे. सद्यस्थितीत 14 एप्रिलपर्यंत ही स्थिती राहणार असल्याचे सांगितले जात असले तरी पुढील अनिश्चित काळासाठी हीच स्थिती कायम राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे फक्त जळगाव शहरच नाही तर जिल्हाभरातील हातावर पोट घेऊन काम केल्यावरच पोटाची खळगी भरू शकणाऱ्या सुमारे एक लाखांहून अधिक मजूर आणि कामगारांना भाकरीची चिंता सतावत आहे. लॉकडाऊनच्या काळात जळगाव शहरातील दररोजची कोट्यावधी रुपयांची आर्थिक उलाढाल ठप्प झाली आहे. याची झळ सर्वसामान्य नागरिकांसह मजूर आणि कामगार वर्गाला अधिक प्रमाणात बसली आहे.
कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाला प्रतिबंध घालण्यासाठी खबरदारी म्हणून देशभरात 24 मार्चपासून लॉकडाऊन जाहीर झाला आहे. त्यामुळे जळगाव शहरातील सुमारे 1 लाखांहून अधिक घरातील कर्ता पुरुषवर्ग कामावर जाऊ शकलेला नाही. त्यामुळे लाखो कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पुढेही अशी परिस्थिती अनेक दिवस कायम राहण्याची चिन्हे असल्याने आपल्या कुटुंबीयांचे पोट कसे भरायचे? हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.
सर्वाधिक बिकट परिस्थिती ही हातमजूर, बांधकाम कामगार, घर कामगार, रिक्षा चालक, औद्योगिक क्षेत्रातील कामगार आणि मजुरवर्ग यांची आहे. लॉकडाऊन काळामध्ये किराणा माल, दूध, भाजीपाला यासारख्या दैनंदिन वस्तूंसह वैद्यकीय सेवा अविरतपणे सुरू असल्या तरी त्यात कापड दुकाने, भांड्यांची दुकाने, सराफ बाजारातील दुकाने तसेच जनरल स्टोअर्स बंद आहेत. यासारख्या दुकानांमध्येही हजारोंच्या संख्येने कामगार आहेत. पण आता ही दुकाने बंद असल्याने या कामगारांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
जळगावातील विविध क्षेत्रातील कामगारांची संख्या-
नोंदणीकृत बांधकाम कामगार - 18 हजार
अनोंदणीकृत बांधकाम कामगार - 30 हजार
रिक्षा चालक - 1 हजार
औद्योगिक क्षेत्रातील कामगार व मजूर - 5 हजार
घरकाम करणारे कामगार - 15 हजार
बाजारपेठेतील फेरिवाले (हॉकर्स) - 10 हजार
विविध दुकानांमध्ये काम करणारे कामगार - 5 हजार
असंघटीत क्षेत्रातील कामगार व मजूर - 10 हजार