जळगाव - खते व बियाणांच्या वाढत्या किंमती विरोधात जळगाव जिल्ह्यातील जामनेर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. केंद्र सरकारची ध्येयधोरणे शेतकरी विरोधी असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. तसेच, मोर्चेकऱ्यांनी खते व बियाणांच्या किंमती कमी करण्याची मागणी केली. केंद्राने याप्रश्नी लवकर सकारात्मक निर्णय घेतला नाही तर तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष संजय गरुड यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, मोर्चा तहसील कार्यालयावर धडकल्यानंतर तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
'...अन्यथा शेतकरी देशोधडीला लागणार'
'खरीप हंगाम तोंडावर आला आहे. अशा परिस्थितीत शेतकरी खरिपाच्या तयारीला लागला आहे. परंतु, केंद्र सरकारने खते व बियाणांच्या किंमतीत भरमसाठ वाढ केली आहे. आधीच कोरोनामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. त्यातच आता खते व बियाणांच्या वाढीव किंमतीचा त्याला फटका बसणार आहे. केंद्र सरकारच्या जाचक धोरणांमुळे शेतकरी देशोधडीला लागण्याची भीती आहे', असा आरोप मोर्चेकऱ्यांनी केला.
'मोदी सरकारचे मापात पाप'
'मोदी सरकारने रासायनिक खतांच्या नुसत्या किंमतीच वाढवल्या नाहीत. तर मापातही पाप केले आहे. रासायनिक खतांची पूर्वी 50 किलोची पिशवी यायची, आता 45 किलीची पिशवी येत आहे', असा आरोप संजय गरू यांनी केला. तसेच, केंद्र सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो. शेतकरीच आपला अन्नदाता आहे. त्यामुळे मोदी सरकारने शेतकऱ्यांना न्याय द्यावा, असे संजय गरूड यांनी म्हटले.
'या मागण्यांसाठी काढला मोर्चा'
- खते व बियाणांच्या वाढवलेल्या किंमती कमी करा.
- केंद्र सरकारने शेतकरी हिताचे धोरण अवलंबले पाहिजे.
- शेतकऱ्यांना मदत म्हणून विशेष पॅकेज जाहीर करावे.
हेही वाचा - तौक्ते वादळ : समुद्रकिनारी, चौपाट्यांजवळ अग्निशामक दलासह ९३ लाइफगार्ड सज्ज