जळगाव - रावेर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार डॉ. उल्हास पाटील यांनी आज दुपारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टी (कवाडे गट) आघाडीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी शक्तीप्रदर्शन केले.
अर्ज दाखल करताना डॉ. उल्हास पाटील यांच्यासोबत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष संजय गरुड आदी उपस्थित होते. अर्ज दाखल करण्यापूर्वी आघाडीच्या वतीने जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. शहरातील सरदार लेवा भवनात जाहीर मेळावा पार पडला. या मेळाव्यात आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी भाजप सरकारच्या कार्यपद्धतीवर टीकास्त्र सोडले.
डॉ. उल्हास पाटील हे माजी खासदार असून त्यांनी रावेर (तत्कालीन जळगाव) लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीत आघाडी झाल्यानंतर आघाडीच्या जागा वाटपाच्या सूत्रात रावेरची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला गेली होती. मात्र, याठिकाणी राष्ट्रवादीला सातत्याने अपयश येत असल्याने ही जागा काँग्रेसला सोडावी, अशी मागणी काँग्रेसकडून केली जात होती. ही मागणी लक्षात घेता आता ही जागा राष्ट्रवादीने काँग्रेसला सोडली. त्यामुळे काँग्रेसने डॉ. उल्हास पाटील यांना पुन्हा संधी देत भाजपच्या प्रतिस्पर्धी रक्षा खडसे यांच्या विरोधात रिंगणात उतरवले आहे. तब्बल १२ वर्षानंतर रावेरची जागा काँग्रेसच्या वाट्याला आली आहे. या मतदार संघात मराठा, लेवा तसेच आदिवासी मुस्लीम समाजाचे प्राबल्य आहे. गेल्यावेळी खासदार रक्षा खडसे यांनी राष्ट्रवादीचे मनीष जैन यांचा पराभव केला होता. यावेळी खडसे यांच्यासमोर डॉ. उल्हास पाटील यांचे कडवे आव्हान असणार आहे.