जळगाव - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि सेनेची युती झाली आहे. परंतु, जळगाव जिल्ह्यातील बहुतेक मतदारसंघात तिकीट कापलेल्या भाजपच्या नाराज पदाधिकाऱ्यांनी सेनेच्या उमेदवारांविरोधात बंडखोरी केली आहे. असे असताना भाजपचे पक्षश्रेष्ठी कोणताही हस्तक्षेप करत नसल्याने सेनेचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी रविवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेपूर्वी संताप व्यक्त केला. यावेळी त्यांची समजूत काढण्यासाठी आलेले जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी यांच्यात जोरदार खटके उडाले.
महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दुपारी जळगावात राज्यातील प्रचाराची पहिली सभा घेतली. या सभेपुर्वीच गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. भाजपच्या बंडखोर उमेदवारांच्या विषयावर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोलू द्यावे, अशी मागणी गुलाबराव पाटलांनी केली. मात्र, ही बाब सभेच्या प्रोटोकॉल विरोधात असल्याने गिरीश महाजनांनी विरोध केला. त्यामुळे गुलाबराव चांगलेच भडकले.
हेही वाचा - 'विरोधक आता थकलेत, त्यांना उभं राहायलाही आधार लागतोय'
जिल्ह्यातील 11 मतदारसंघातील 4 मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार आहेत. युतीधर्मानुसार भाजप नेत्यांनी त्यांच्या प्रचारात येणे अपेक्षित आहे. मात्र, चोपडा, पाचोरा, जळगाव ग्रामीण आणि एरंडोल या चारही मतदारसंघात भाजपचे बंडखोर अधिकृत उमेदवार असल्यासारखे प्रचार करत असल्याचा आरोप यावेळी पाटील यांनी केला. हे बंडखोर युतीधर्म पाळत नसल्याने त्यांची मला पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे तक्रार करायची आहे. मला त्यांच्याशी बोलू द्यावे, अशी मागणी गुलाबराव पाटील यांनी केली. लोकसभेच्या निवडणुकीत सर्व शिवसैनिकांनी युतीधर्मानुसार भाजपच्या दोन्ही उमेदवारांचा स्वखर्चाने प्रचार केला. मात्र, भाजप बंडखोर युतीधर्म पाळत नसून त्यांच्याबाबत काय? असा प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला.
या विषयावरून गिरीश महाजन यांनी नंतर बोलूया, असे सांगितल्याने गुलाबराव पाटील संतप्त झाले होते. मात्र, नंतर दोघांनी आक्रमक पवित्रा मागे घेतल्याने तणाव निवळला.
हेही वाचा - पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज जळगावात जाहीर सभा, कडक सुरक्षा व्यवस्था तैनात