जळगाव - जिल्ह्यात ठिकठिकाणी कोरोनाच्या लसीकरण प्रक्रियेत गोंधळ सुरू आहे. रविवारी भुसावळ शहरातील बद्री प्लॉटमधील लसीकरण केंद्रावर नागरिकांनी लस न मिळाल्याने चांगलाच गोंधळ घातला. टोकन असूनही आपल्याला लस मिळाली नाही, असा आरोप करत नागरिकांनी संताप व्यक्त केला. दरम्यान, या केंद्रावरील आरोग्य सेवकांनी नागरिकांच्या आरोपांचे खंडण केले. काही नागरिकांकडे शनिवारी (15 मे) रोजी वाटप केलेले टोकन होते, त्यामुळे त्यांचा गैरसमज झाल्याचा दावा आरोग्य सेवकांनी केला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
भुसावळ शहरातील बद्री प्लॉट परिसरात कोरोनाचे लसीकरण केंद्र आहे. या केंद्रांवर शनिवारी लसीचे 300 डोस उपलब्ध झाले होते. त्यानुसार रविवारी नागरिकांना टोकन वाटप करत लसीकरणाचे नियोजन करण्यात आले. मात्र, लसीकरणाला सुरुवात होण्यापूर्वीच 300 पैकी 100 डोस हे रेल्वे हॉस्पिटलमध्ये असलेल्या लसीकरण केंद्राला देण्यात आले. उर्वरित 200 डोस पैकी 20 टक्के डोस फ्रंटलाईन वर्कर्ससाठी राखीव होते. म्हणजेच 160 जणांना लस देण्यात आली. अशा परिस्थितीत 160 च्या पुढे नंबर असलेल्या टोकनधारकांनी लस मिळाली नाही म्हणून गोंधळ घातला. सकाळी आम्हाला 300 डोस उपलब्ध असल्याचे सांगितले. आता केवळ 160 जणांना लस मिळाली. काहीतरी गडबड असल्याचा आरोप करत नागरिक संताप व्यक्त केला.
पहाटेपासून रांगेत पण लस मिळालीच नाही
शहरातील काही नागरिक पहाटे पाच वाजेपासून लस घेण्यासाठी रांगेत उभे होते. पण त्यांना लस मिळाली नाही. काही जणांकडे शनिवारी दिलेले टोकन होते, त्यांनाही लस मिळाली नाही. केंद्रावरील लस संपली आहे, हे लक्षात येताच नागरिकांनी लस न घेताच घरचा रस्ता धरणे पसंत केले.
लसीकरण सुरळीत करण्याची मागणी
राज्य सरकारने लसींचे पुरेसे डोस उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी केली जात आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरणाची टक्केवारी वाढणे गरजेचे आहे. लसीकरणाचे महत्त्व पटल्याने आता नागरिक लसीकरणासाठी पुढे येत आहेत, परंतु, डोस उपलब्ध होत नसल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. लसीकरणर सुरळीत करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
हेही वाचा - कांगावाखोरांना मी उत्तर देत नाही, देवेंद्र फडणवीसांचा नाना पटोलेंना टोला