जळगाव - जिल्ह्यातील चोपडा विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी राखीव आहे. या मतदारसंघात सध्या स्थानिक उमेदवारीचा मुद्दा कळीचा बनला आहे. स्थानिक उमेदवारीच्या मुद्यावरून येथील नेतेमंडळींमध्ये जोरदार खल सुरू आहे. गेल्या वेळी पंचरंगी लढत रंगलेल्या या मतदारसंघात आता राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. युतीच्या तहात हा मतदारसंघ सेनेच्या वाट्याला आहे. परंतु, तत्कालीन जळगाव नगरपालिकेच्या घरकुल घोटाळ्यात सेनेचे विद्यमान आमदार चंद्रकांत सोनवणे यांना शिक्षा झाल्याने ऐनवेळी तुल्यबळ उमेदवार शोधण्याची वेळ सेनेवर आली आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादीकडून देखील सक्षम उमेदवाराचा शोध सुरू आहे. यावेळी सेना आणि राष्ट्रवादी अशी लढत चोपड्यात रंगण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - विरोधक अजूनही चाचपडत आहेत; एकनाथ खडसेंचे विरोधकांवर टीकास्त्र
तापी, अनेर, गुळ अशा नद्यांचे वरदान लाभलेल्या चोपडा विधानसभा मतदारसंघात सध्या निवडणुकीचे जोरदार वारे वाहत आहेत. यावेळी विधानसभेची निवडणूक जाहीर झाली असली तरी सर्वच राजकीय पक्षांचे अद्याप उमेदवार निश्चित झालेले नाहीत. घरकुल घोटाळ्यात सेनेचे विद्यमान आमदार चंद्रकांत सोनवणे यांना शिक्षा झाल्याने ते कायद्याच्या कचाट्यात अडकले आहेत. त्यांना निवडणूक लढवता येणार नसल्याने ऐनवेळी धावपळ होऊ नये म्हणून सेनेने स्थानिक उमेदवारांची चाचपणी केली आहे. सोनवणे यांच्याऐवजी त्यांच्या पत्नी लता सोनवणे किंवा माजी आमदार कैलास पाटील यांना पुढे केले जाऊ शकते. सेनेकडून जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या इंदिरा पाटील यांचे नाव पुढे येऊ शकते. स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये देखील रस्सीखेच पाहायला मिळत आहे. आघाडीच्या जागा वाटपाच्या सूत्रात हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला येतो. भाजपतून राष्ट्रवादीत दाखल झालेले माजी आमदार चंद्रकांत वळवी, जळगावचे माजी महापौर किशोर पाटील यांच्या पत्नी माधुरी पाटील, चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक आनंदराव रायसिंग, पंचायत समितीचे माजी सभापती डी. पी. साळुंखे ही नावे आघाडीवर आहेत.
हेही वाचा - आम्ही काय मेलेल्या आईचे दूध पिलो नाही; गुलाबराव पाटलांचा भाजपला इशारा
राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्या सावलीत जगदीश वळवी यांनी नवी मोट बांधली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे अन्य इच्छुक कोणती वाट निवडतात? याकडे लक्ष लागले आहे. वंचित बहुजन आघाडी, मनसे, बसपाने अद्याप पट्टे उघडलेले नाहीत. भाजप आणि सेनेत युती तुटली तर भाजपकडून डॉ. चंद्रकांत बारेला, जळगाव जिल्हा परिषदेचे सदस्य प्रभाकर सोनवणे, सेवानिवृत्त परिवहन आयुक्त गोविंद सैंदाणे, यावल पंचायत समितीच्या माजी सदस्या प्रज्ञा सपकाळे यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते. सर्वत्र पक्षांतराचे पेव फुटलेले असताना येथील राजकीय मंडळी मात्र, वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे. उमेदवारांची नावे जाहीर झाल्यानंतर बंडखोरीचे लोण पसरू शकते.
गेल्या वेळी काय घडले होते?
सन २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत सेनेचे उमेदवार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी बाजी मारली होती. त्यांनी निकटचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माधुरी पाटील यांचा पराभव केला होता. सोनवणे यांनी ५४ हजार १७६ मते मिळवून विजयश्री खेचून आणली होती. माधुरी पाटील यांना ४२ हजार मते पडली होती. त्याचप्रमाणे जगदीश वळवींना ३० हजार ५५९, अपक्ष लढलेले चंद्रकांत बारेला यांना २४ हजार ५०६, काँग्रेसचे ज्ञानेश्वर भादले यांना १० हजार २८० तसेच मनसेचे इतबार तडवींना १८ हजार ५३६ मते मिळाली होती. पंचरंगी झालेल्या लढतीत मतांचे विभाजन झाल्याने प्रा. चंद्रकांत सोनवणे यांना फायदा होऊन ते विजयी झाले होते.
हेही वाचा - चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ : राष्ट्रवादीची लागणार कसोटी तर भाजपत इच्छुकांची भाऊगर्दी
मतदारसंघात मूलभूत सुविधांचा अभावच
या मतदारसंघात मूलभूत सोयीसुविधांचा अभावच आहे. तालुक्यात बहुसंख्य गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासते. रस्त्यांचा प्रश्नही गंभीरच आहे. सिंचनासाठी पाण्याचा प्रश्नही गंभीर आहे. तापी, अनेर यासारख्या नद्या वाहत असल्या तरी योग्य नियोजनाअभावी सिंचनाची व्यवस्था झालेली नाही. सर्वात महत्त्वाचा मुद्दा रोजगाराचा आहे. शैक्षणिक सुविधांचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे. चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखाना हा तालुक्याचा महत्त्वाचा मुद्दा आहे. हा कारखाना भाडेतत्वावर देण्याचा ठराव झाला आहे. पण तो विषय मार्गी न लागल्याने शेतकरी नाराज झाले आहेत. चहार्डी औद्योगिक वसाहतीचा मुद्दा देखील मागे पडला आहे.
असा आहे मतदारसंघ -
एकूण मतदार : ३ लाख ५ हजार ५१३
पुरुष मतदार : १ लाख ५७ हजार २६७
महिला मतदार : १ लाख ४८ हजार २४५
गेल्या वेळेची परिस्थिती -
प्रा. चंद्रकांत सोनवणे (शिवसेना) : ५४ हजार १७६ मते
माधुरी पाटील (राष्ट्रवादी) : ४२ हजार २४१ मते
जगदीश वळवी (भाजप) : ३० हजार ५५९ मते
चंद्रकांत बारेला (अपक्ष) : २४ हजार ५०६
ज्ञानेश्वर भादले (काँग्रेस) : १० हजार २८० मते
इतबार तडवी (मनसे) : १८ हजार ५३६ मते