जळगाव - जिल्ह्यातील यावल तालुक्यातील हिंगोणा गावाजवळ रविवारी मध्यरात्री घडलेल्या क्रूझर आणि डंपरच्या भीषण अपघातातील मृतांची संख्या 12 वर पोहचली आहे. या अपघातात 8 महिला, 2 पुरुष, 1 मुलगी तसेच एका मुलाचा समावेश आहे. हृदयद्रावक बाब म्हणजे, एकाच गावातील 9 जणांचा मृतांमध्ये समावेश असून त्या सर्वांची एकाचवेळी अंत्ययात्रा निघाली. अपघातातील मृतांवर शोकाकुल वातावरणात सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जमलेल्या पंचक्रोशीतील ग्रामस्थांना अश्रू अनावर झाले होते. या घटनेमुळे चिंचोल, चांगदेव तसेच निंबोल गावात एकही घरात चूल पेटली नाही.
मुक्ताईनगर तालुक्यातील चिंचोल गावातील चौधरी कुटुंबीयांवर काळाने घाला घातला. चिंचोल येथील रहिवासी असलेले प्रभाकर उर्फ बाळू नारायण चौधरी यांच्या मुलीचा 3 दिवसांपूर्वीच रावेर तालुक्यातील ऐनपूरला विवाह सोहळा पार पडला होता. प्रभाकर चौधरी यांचे व्याही चोपडा येथे नगरपरिषदेत नोकरीला असल्याने त्यांनी चोपड्याला रिसेप्शन ठेवलेले होते. या कार्यक्रमासाठी चौधरी कुटुंबीय चोपड्याला गेलेले होते. रिसेप्शन आटोपून घरी परतत असताना वाटेतच हा अपघात घडला असून या अपघातामुळे संपूर्ण जिल्हा हादरला आहे.
यावल तसेच जळगाव येथून मृतांवर शवविच्छेदन केल्यानंतर दुपारी 4 नंतर अपघातातील मृतांचे मृतदेह त्या-त्या गावी आणण्यात आले. चिंचोल येथील 9 जणांचा अपघातात मृत्यू झाला असून त्यात 8 जण चौधरी कुटुंबातील तर एक कोळी कुटुंबातील आहे. त्यामुळे चिंचोल गाव सुन्न झाले आहे. चौधरी कुटुंबीयांवर कोसळलेल्या दुःखाने त्यांच्या नातेवाईकांसह मित्रपरिवाराने हृदय हेलवणारा आक्रोश केला. मृतांवर गावशेजारील एका शेतात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारासाठी चिंचोल पंचक्रोशीतील ग्रामस्थ आले होते.
अपघातातील मृतांची नावे अशी -
1) मंगलाबाई ज्ञानेश्वर चौधरी (वय 65, रा. चिंचोल, ता. मुक्ताईनगर) |
2) प्रभाकर उर्फ बाळू नारायण चौधरी (वय 60, रा. चिंचोल, ता. मुक्ताईनगर) |
3) आश्लेषा उमेश चौधरी (वय 28, रा. चिंचोल, ता. मुक्ताईनगर) |
4) रिया जितेंद्र चौधरी (वय 14, रा. चिंचोल, ता. मुक्ताईनगर) |
5) प्रभाबाई प्रभाकर उर्फ बाळू चौधरी (वय 40, रा. चिंचोल, ता. मुक्ताईनगर) |
6) सोनाली जितेंद्र चौधरी (वय 34, रा. चिंचोल, ता. मुक्ताईनगर) |
7) प्रियंका नितीन चौधरी (वय 28, रा. चिंचोल, ता. मुक्ताईनगर) |
8) सोनाली सचिन महाजन (वय 34, रा. चांगदेव, ता. मुक्ताईनगर) |
9) सुमनबाई श्रीराम पाटील (वय 55, रा. निंबोल, ता. रावेर) |
10) संगीता मुकेश पाटील (वय 40, रा. निंबोल, ता. रावेर) |
11) धनराज गंभीर कोळी (वय 35, रा. चिंचोल, ता. मुक्ताईनगर) |
12) शिवम प्रभाकर चौधरी (वय 15, रा. चिंचोल, ता. मुक्ताईनगर) |