जळगाव - नेरीनाका परिसरातील एसटी वर्कशॉपमध्ये बस मागे घेत असताना मागे उभ्या असलेल्या चार्जमनला धक्का लागला आणि दोन बसच्यामध्ये दाबल्या गेल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी 10 वाजता घडली. भीकन शंकर लिंडायत (वय 57, रा. एसटी कॉलनी) असे मृत चार्जमनचे नाव आहे.
भीकन लिंडायत हे गेल्या 8 दिवसांपासून सुट्टीवर होते. सुट्टीनंतर आज सकाळी 8 वाजता ते ड्युटीवर गेले होते. वर्कशॉपमध्ये दुरूस्त झालेल्या एका एसटी बसच्या मागे उभे राहून ते चालक सतीष वानखेडे यांना दिशानिर्देश देत होते. यातच मागे एक बस उभी असल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही. तर, समोरच्या चालकाने बस वेगाने माघारी घेतल्याने त्यांना धक्का लागला. यामुळे लिंडायत हे दोन्ही बसच्या मध्ये दाबल्या गेले व त्यांचा जागीच मृत्यू झाला.
काम सुरू करताच अवघ्या काही क्षणांमध्ये झालेल्या या अपघातामुळे एसटी वर्कशॉपमध्ये प्रचंड खळबळ उडाली. तेथे उपस्थित इतर अधिकारी कर्मचाऱ्यांनी लिंडायत यांना सुरुवातीला 2 खासगी रुग्णालयात नेले. या रुग्णालयात त्यांना दाखल करून घेतले नाही. यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. लिंडायत यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, जयेश व दोन विवाहित मुली असा परिवार आहे.
31 डिसेंबरला होती सेवानिवृत्ती
8 दिवसांपासून सुट्टीवर असलेल्या लिंडायत यांना आज अचानक फाेन करून ड्युटीवर बोलावण्यात आले होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्यांना त्रास दिला जात होता. कोरोना संकट असून देखील बेकायदेशीरपणे त्यांना ड्युटीवर बोलावण्यात आले. यानंतर त्यांच्यासोबत ही घटना घडली. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी लिंडायत यांचे चिरंजीव जयेश यांनी केली आहे. लिंडायत हे 31 डिसेंबर 2020 ला सेवानिवृत्त होणार होते. तत्पूर्वीच काळाने त्यांच्यावर घाला घातला.