जळगाव - महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. महाराष्ट्र राज्याला अनेक थोर नेत्यांचा वारसा लाभला असून आपले राज्य हे या विचारांचा वारसा जपणारे आहे. राज्याने विविध क्षेत्रात प्रगती करून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे, असे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ शहरातील पोलीस कवायत मैदानावर पार पडला. यावेळी उपस्थितांना शुभेच्छा देताना ते बोलत होते.
चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, आपल्या महाराष्ट्राचा ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक वारसा फार मोठा आहे. देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी आणि त्यानंतरही देशाच्या प्रत्येक विधायक उपक्रमात महाराष्ट्राने हिरीरीने सहभाग घेतला आहे. प्राचीन संस्कृतीचा वारसा जपण्यासाठी आपल्या महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. महाराष्ट्राच्या धार्मिक, सामाजिक सुधारणांचा इतिहास प्रेरणादायी असून राज्याचे विविधांगी भावविश्व थक्क करणारे आहे. महाराष्ट्र ही संतांची, ऋषीमुनींची जशी भूमी आहे; तशीच ती शुरवीरांची देखील भूमी आहे. या भूमीला पराक्रमाची, त्यागाची, देशप्रेमाची परंपरा लाभली आहे, असे ते म्हणाले.
पोलीस कवायत मैदानावर सकाळी ८ वाजता चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. त्यानंतर शानदार संचलन करण्यात आले. त्यात जिल्हा पोलीस दल, होमगार्ड पुरुष व महिला पथक, शहर वाहतूक शाखा, बॉम्ब शोधक व नाशक पथक, पोलीस बँड पथक, वरूण पथक, जळगाव शहर महापालिकेचे अग्निशमन पथक तसेच निर्भया पथकांनी संचलनात सहभाग घेतला. या संचलनाचे नेतृत्व कमांडिंग ऑफिसर भुसावळ उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक गजानन राठोड यांनी केले तर सेकंड कमांडिंग ऑफिसर राखीव पोलीस निरीक्षक सुभाष कावरे होते.
यावेळी शहरातील काशिनाथ पलोड शाळेच्या विद्यार्थ्यांनी मल्लखांब, सेंट टेरेसा स्कूलच्या विद्यार्थ्यांनी रोप मल्लखांब तर योगशिक्षिका अनिता पाटील यांच्या विद्यार्थ्यांनी रिदमीक योगा सादर करून सोहळ्यात रंगत वाढवली.