जळगाव - कोरोनामुळे संपूर्ण भारतभर लाॅक डाऊन आहे. रेल्वेची प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद असताना जीवनावश्यक वस्तूंचा अखंड पुरवठा करण्यासाठी भारतीय रेल्वे 24×7 काम करत आहे. यासाठी रेल्वेचे हजारो कर्मचारी रात्रंदिवस राबत आहेत. मध्य रेल्वेकडून 1700 रॅकद्वारे अत्यावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्यात येतोय. अन्नधान्य, मीठ, साखर, दूध, खाद्यतेल, कांदे, फळे आणि भाज्या, पेट्रोलियम उत्पादने, कोळसा इत्यादी वस्तू सर्व रेल्वे टर्मिनसवर लोड केल्या जात आहेत.
कोरोना विषाणूमुळे भारतीय रेल्वेने 31 मार्च 2020पर्यंत देशभरातील प्रवासी सेवांचे कामकाज स्थगित केले आहे. सध्या भारतीय रेल्वे देशभरात फक्त मालवाहतूक करणाऱ्या गाड्या चालवत आहे. भारतीय रेल्वे मालवाहतूक सेवांच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहे. विविध राज्यांतील लॉक डाऊनच्या परिस्थितीत देशातील अत्यावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम होणार नाही, याची दक्षता घेण्यासाठी अनेक माल धक्के (गुड्स शेड), स्थानके आणि नियंत्रण कार्यालयांवर तैनात असलेले भारतीय रेल्वेचे कर्मचारी सतत कार्यरत आहेत.
राज्य सरकारशी सातत्याने समन्वय साधण्यात येत आहे. यामुळे कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या विविध निर्बंधांमध्येदेखील जीवनावश्यक वस्तूंचे रॅक कोणत्याही विलंबाशिवाय सहजतेने हाताळले जातील. रेल्वे प्रशासनाने 31 मार्चपर्यंत जीवनावश्यक वस्तूंच्या आणि पार्सलच्या विम्याच्या दरातदेखील कपात केली आहे.