जळगाव - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची दिल्लीतील सुरक्षा केंद्र सरकारने काढून घेतली आहे. या प्रकारामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जळगाव महानगर शाखेच्या वतीने शनिवारी दुपारी 1 वाजता आकाशवाणी चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन करत केंद्र सरकारच्या भूमिकेचा निषेध नोंदविण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी देखील सहभाग नोंदवला होता. केंद्र सरकारच्या भूमिकेची खिल्ली उडण्यासाठी महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनप्रसंगी थाळीनाद केला. तसेच केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. केंद्र सरकारने शरद पवारांची सुरक्षा सूड भावनेतून काढली आहे. हा निर्णय चुकीचा आहे. त्यातून सरकारचा पक्षपातीपणा देखील समोर आला आहे, अशा शब्दांत यावेळी आंदोलकांनी टीका केली.
हेही वाचा - 'राज्य सरकारच्या कल्पनाशक्तीची कमाल वाटतेय, रोज नवीन काहीतरी बाहेर काढताहेत'
दरम्यान, शरद पवारांची सुरक्षा व्यवस्था काढून घेण्यात आली असली तरी काहीही फरक पडत नाही. सर्वसामान्य जनता त्यांच्या पाठीशी आहे. जनतेचे आशीर्वाद आहेत, तोवर त्यांचे कुणीही काही वाकडे करू शकत नाही, अशा प्रतिक्रिया देखील यावेळी आंदोलकांनी दिल्या.
जमावबंदी आदेशाचे उल्लंघन -
जळगाव जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू आहे. असे असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केल्याने पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलकांना ताब्यात घेतले होते. रामानंदनगर पोलीस ठाण्यात आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
हेही वाचा - VIDEO : सिंचन बैठकीत अशोक चव्हाण देत होते सूचना, तर जिल्हाधिकारी घेत होते डुलक्या