जळगाव - आपल्याकडे कोरोनाचा एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे, अशी चुकीची आणि दिशाभूल करणारी अफवा सोशल मीडियावर व्हायरल करणे दोघांना चांगलेच महागात पडले आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरात हा प्रकार घडला असून याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन देखील केले आहे.
प्रवीण बच्छाव आणि दत्तू पाटील, अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. या दोघांनी कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता आपल्या भागात कोरोनाचा एक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आला आहे, अशी पोस्ट व्हाट्सअॅपवर व्हायरल केली. ही माहिती दिशाभूल करणारी आणि जनतेत भीती निर्माण करणारी असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानुसार पाचोरा पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक सुनील पाटील यांनी दोघांविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यानुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, सध्या सोशल मीडियावर कोरोनाविषयी विविध प्रकारची माहिती प्रसारित होत आहे. मात्र, नागरिकांनी राज्य सरकार तसेच जिल्हा प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, अफवांना बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.
हेही वाचा - प्रसवकळा सुरू झालेल्या महिलेसाठी देवदूत म्हणून धावले पोलीस