जळगाव - राज्यभरातील रक्तपेढ्यांमध्ये सध्या रक्ताची मोठ्या प्रमाणावर टंचाई जाणवत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्तदान चळवळीवर झालेला परिणाम आणि कोरोना लसीकरणामुळे भीतीपोटी रक्तदात्यांनी रक्तदान करण्याकडे फिरवलेली पाठ या प्रमुख कारणांमुळे ही रक्तटंचाई उद्भवली आहे. याचा फटका सामान्य रुग्णांना तर बसतोच आहे. मात्र, थॅलेसेमिया, सिकलसेल सारख्या गंभीर आजार असलेले रुग्ण व किडनीच्या विकारामुळे सतत डायलिसीसची गरज भासणाऱ्या रुग्णांची रक्ताच्या टंचाईमुळे परवड होत आहे.
'या' कारणांमुळे आटला रक्ताचा ओघ
जळगाव शहरासह जिल्ह्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्तसाठा मोठ्या प्रमाणावर घटला असून, रक्ताची टंचाई निर्माण झाली आहे. कोरोनामुळे रक्तदात्यांनी रक्तदान करण्याकडे पाठ फिरवली आहे. याशिवाय सेवाभावी संघटना, शाळा-महाविद्यालये, खासगी कंपन्यांनी तसेच राजकीय पक्षांच्या वतीने होणाऱ्या रक्तदान शिबिरांचा ओघही कमी झाला आहे. त्यामुळे रक्ताचा पुरवठा कमी झाला आहे. अशा परिस्थितीत मागणी जास्त आणि उपलब्धता कमी झाल्याने ही आणीबाणीची परिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदानासाठी पुढे यावे, असे आवाहन रक्तपेढ्यांच्या वतीने केले जात आहे.
मागणी अधिक आणि पुरवठा कमी
कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी झाल्याने हालचाली पुन्हा सुरू झाल्या आहेत. अशा परिस्थितीत अपघातांचे काहीअंशी प्रमाण वाढले आहे. नॉन कोविड रुग्णांच्या शस्त्रक्रियांचे प्रमाणही वाढू लागले आहे. अशा परिस्थितीत रक्ताची मागणी वाढली आहे. एकीकडे रक्ताची मागणी वाढलेली असताना दुसरीकडे, रक्ताची उपलब्धता कमी झाल्याने रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. राज्यभर हीच स्थिती असून, रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदानासाठी पुढे येण्याची गरज आहे. त्या अनुषंगाने रक्तपेढ्यांकडून रक्तदानाचे आवाहन केले जात आहे.
रक्तपेढ्यांची होत आहे तारेवरची कसरत
जळगाव शहरासह जिल्ह्यातील सर्वच रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा मर्यादित साठा उपलब्ध आहे. जळगाव शहर आणि परिसर मिळून पाच रक्तपेढ्या आहेत. याशिवाय जिल्ह्यात अमळनेर, चाळीसगाव, भुसावळ, चोपडा याठिकाणी खासगी रुग्णालयांच्या रक्तपेढ्या आहेत. या सर्वच रक्तपेढ्यांमध्ये आजच्या घडीला मर्यादित स्वरुपाचा रक्तसाठा शिल्लक आहे. निम्म्याहून अधिक साठा घटला आहे. जळगाव शहरातील इंडियन रेडक्रॉस सोसायटी, माधवराव गोळवलकर, रेडप्लस, जिल्हा रुग्णालय तसेच डॉ. उल्हास पाटील रुग्णालय या पाच रक्तपेढ्या गरजू रुग्णांना रक्तपुरवठा करण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र, आता या सर्वच रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. काही रक्तपेढ्यांमध्ये तर एक किंवा दोनच दिवस पुरेल एवढा रक्तसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे रक्ताची मागणी पूर्ण करताना रक्तपेढ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
'रक्तदात्यांनी स्वतःहून रक्तदानासाठी पुढे यावे'
रक्तपेढ्यांमधील रक्ताच्या तुटवड्यासंदर्भात 'ईटीव्ही भारत'शी बोलताना माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढीचे डॉ. मकरंद वैद्य म्हणाले, की सद्यस्थितीत रक्ताचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा भासत आहे. आपल्याकडे कोरोनाचा प्रादुर्भाव आता ओसरला आहे. त्यामुळे नागरिकांची मूव्हमेंट वाढली आहे. अशा परिस्थितीत अपघातांचे प्रमाण वाढले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर नॉन कोविड ऍक्टिव्हिटी देखील थांबल्या होत्या. आता प्रादुर्भाव कमी असल्याने नॉन कोविड ऍक्टिव्हिटी सुरू झाल्या आहेत. अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया देखील केल्या जात आहेत. अशा परिस्थितीत रक्ताची मोठ्या प्रमाणावर गरज भासत आहे. रक्ताची मागणी वाढल्यानंतर दुसरीकडे, विविध राजकीय पक्ष, सेवाभावी संघटना, शाळा-महाविद्यालये यांच्या वतीने आयोजित करण्यात येणारे शिबिरे कमी झाले आहेत. कोरोनाच्या भीतीपोटी आधीच रक्तदाते रक्तदानासाठी समोर येत नाही. त्यातच आता कोरोना लसीकरणाबाबतही गैरसमज आहेत. लस घेतल्यानंतर किती दिवसांनी रक्तदान करावे, याबाबत संभ्रम असल्याने नागरिक रक्तदान करायला घाबरतात. यामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. रक्तदात्यांनी स्वतःहून पुढे येण्याची गरज आहे, असेही डॉ. वैद्य यांनी सांगितले.
रक्तदानाबाबत काय म्हणते वैद्यकशास्त्र?
कोरोना आजारातून बरे झाल्यानंतर तसेच कोरोना लसीकरणानंतर किती दिवसांनी रक्तदान करावे? याबाबत नागरिकांच्या मनात अनेक संभ्रम आहेत. यासंदर्भात जळगाव जिल्हा आयएमएचे सचिव डॉ. राधेश्याम चौधरी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाले, की एखाद्या व्यक्तीला कोरोना आजार झाला, नंतर तो व्यक्ती कोरोनातून बरा झाल्यानंतर त्याने पुन्हा कोरोनाची चाचणी करावी. ती चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर 14 दिवसांनी रक्तदान करता येऊ शकते. कोरोनाची लस घेतल्यानंतरही असेच आहे. एखाद्या व्यक्तीने कोरोनाची लस घेतली तर लस घेतल्यानंतर 14 दिवसांनी ती व्यक्ती रक्तदान करू शकते. या पद्धतीने रक्तदान करायला काहीही अडचण नाही. रक्तदान केल्याने शरीरावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नाही. शरीरात रक्त निर्माण होण्याची प्रक्रिया सातत्याने सुरू असते. लस घेतल्यावर रक्तदान केल्याने अँटिबॉडीज निघून जातील, हा गैरसमज आहे. अँटिबॉडीज या शरीरात निर्माण होतात. नंतर त्या रक्तातून प्रवाहित होत असतात. शरीरात अँटिबॉडीज तयार होणे ही पूर्णपणे वेगळी प्रक्रिया आहे. हे लक्षात घ्यायला हवे, असेही डॉ. राधेश्याम चौधरी यांनी सांगितले.
'या' आजारांसाठी भासते रक्ताची सर्वाधिक गरज
राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणांसह मुंबई, पुणे, नागपूर अशा महानगरांमध्ये थॅलेसेमिया, सिकलसेल अशा आजाराच्या रुग्णांसह किडनी विकाराने ग्रस्त असलेले व डायलिसीसवरील रुग्ण, ऑर्गन तसेच बोन मॅरो ट्रान्सप्लांटच्या रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यांच्यासाठी दिवसाकाठी राज्यात हजारो रक्तपिशव्यांची गरज भासते. मात्र अलीकडे रक्तदात्यांनी पाठ फिरवल्याने ही गरज भरून काढणे जिकिरीचे झाले आहे. त्यातच रस्ते अपघात, लहान-मोठ्या शस्त्रक्रियांसाठी रक्ताची गरज भासत आहे. त्यामुळे रक्तदान चळवळीला गती येण्याची गरज आहे.
हेही वाचा - 'लसीकरण करा अन् पैठणी जिंका', येवल्यातील साईनाथ संस्थानचा उपक्रम