जळगाव - सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द केल्याने राज्य सरकारच्या विरोधात भाजपने आज राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाची हाक दिली होती. जळगावात भाजप खासदार रक्षा खडसेंच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. सकाळी 11 वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत संतप्त भावना व्यक्त केल्या. ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत करण्यात यावे, अशी एकमुखी मागणी यावेळी आंदोलकांतर्फे करण्यात आली.
हेही वाचा - जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन विशेष: सहा महिन्यात आर्थिक राजधानीत 43 कोटींची कारवाई
पोलिसांची अडवणूक आणि कार्यकर्त्यांची पळापळ -
भाजपचे हे आंदोलन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर आकाशवाणी चौकात करण्याचे पूर्वनियोजित होते. त्यामुळे सकाळी 10 वाजेपासून याठिकाणी पोलिसांचा तगडा फौजफाटा तैनात होता. 11 वाजता आंदोलक जमल्यानंतर पोलिसांनी त्यांची अडवणूक केली. त्यामुळे आंदोलकांची इकडेतिकडे पळापळ झाली. आकाशवाणी चौकातून आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने चालून गेले. तेव्हा पोलिसांनी पुढच्या चौकात त्यांना अडवले. तेव्हा आंदोलकांनी जागीच ठिय्या मांडून रस्त्यावरील वाहने अडवून धरली. काही कार्यकर्ते थेट एसटी बसवर चढले, तर काहींनी वाहनांसमोर झोपून घोषणाबाजी केली. अर्धा तासानंतर कार्यकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले.
'राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ही वेळ' -
आज ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपकडून राज्यभर आंदोलन केले गेले. याबाबत आम्ही राज्य सरकारला पूर्वकल्पना दिली होती. मात्र, त्यांनी दुर्लक्ष केले. ओबीसी असो किंवा मराठा समाजाला आरक्षण देण्याचा विषय असो, राज्य सरकारची मानसिकताच नाही. राज्य सरकारने न्यायालयात पुरावे सादर करून ओबीसींचे आरक्षण टिकवणे अपेक्षित होते. पण राज्य सरकारने काहीही न केल्याने आज आम्हाला आंदोलन करण्याची वेळ आली असल्याचे खासदार रक्षा खडसेंनी केला. तसेच ओबीसी आरक्षणप्रश्नी केंद्र जबाबदार नाही, पण राज्य सरकार दिशाभूल करत आहे. इम्पिरिकल डाटा राज्य सरकारने द्यायला हवा. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ही वेळ आल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.