जळगाव - राज्यभरातील मंदिरे उघडण्यात यावीत, आज भाजपकडून राज्यात घंटानाद आंदोलन करण्यात येत आहे. या पार्श्वभुमीवर जळगावमध्ये भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला विविध धार्मिक संघटनांनीही पाठिंबा दिला. राज्य सरकार दारूची दुकाने उघडण्यास परवानगी देत आहे. मात्र, मंदिरे उघडण्यास नकार देत असल्याची टीका करत राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
देशात सर्वत्र कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाचा संसर्ग पाहता 24 मार्चपासून देशात लॅाकडाऊन लागू करण्यात आले. परंतु, केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राज्य सरकारने लॉकडाऊनमध्ये टप्प्याटप्प्याने शिथिलता प्रदान करण्यास सुरुवात केली आहे. अनलॉकच्या पाचव्या टप्प्यापर्यंत अनेक गोष्टींमध्ये अटी व शर्तींच्या अधीन सूट देण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील सर्व मंदिरेदेखील उघडण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी धार्मिक संघटना तसेच जनतेकडून केली जात आहे. जळगाव शहरातील गोलाणी मार्केट परिसरात असलेल्या हनुमान मंदिरासमोर भाजपने आंदोलन केले.
एकीकडे राज्य सरकार दारूची दुकाने उघडण्यास परवानगी देत आहे. मात्र, मंदिरे उघडण्यास नकार देत आहे, अशी टीका यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली. मंदिरे बंद असल्याने अनेक व्यावसायिकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेकांचे व्यवसाय ठप्प पडले आहेत त्यामुळे राज्य सरकारने मंदिरे उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी आमदार सुरेश भोळे यांनी केली. तर, राज्य सरकारने मंदिरे उघडण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.