जळगाव - पक्षांतर्गत कुरघोड्यांना कंटाळून ज्येष्ठ नेते तथा माजीमंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे भाजपला मोठा फटका बसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यापूर्वी भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या मुक्ताईनगरात गुरुवारी भाजपला बैठकीसाठी कार्यकर्तेही मिळाले नाहीत. विशेष म्हणजे, खडसेंच्या पक्षांतरामुळे मुक्ताईनगरातील या स्थितीची पूर्वकल्पना असल्याने खडसेंच्या मतदारसंघात जाऊन बैठक घेणेही भाजप नेते गिरीश महाजन यांनी टाळले. मोजक्या वरिष्ठ नेत्यांनी बोटावर मोजता येतील इतक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बैठकीचा सोपस्कार उरकला.
एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तरी भाजपला काही फरक पडणार नाही, असे भाजप नेत्यांना वाटत आहे. परंतु, त्यांचा हा आत्मविश्वास फोल ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. कारण, खडसे यांचा बालेकिल्ला असलेल्या मुक्ताईनगरमध्ये पक्षबांधणीसाठी गुरुवारी आयोजित केलेल्या बैठकीकडे नेते आणि कार्यकर्त्यांनी पाठ फिरवल्याचा प्रकार समोर आला आहे. खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशानंतर भाजपकडून जिल्ह्यात ठिकठिकाणी बैठकांचे सत्र सुरू आहे. गुरुवारी मुक्ताईनगरमध्ये प्रथमच भाजपकडून पक्षबांधणीसाठी बैठक बोलावण्यात आली होती. मात्र, या बैठकीला तुरळक स्थानिक कार्यकर्त्यांनीच हजेरी लावली. माजीमंत्री आणि एकनाथ खडसे यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी असलेले गिरीश महाजन यांनीही बैठकीकडे पाठ फिरवली. मुक्ताईनगरला झालेल्या बैठकीत प्रदेश संघटन मंत्री विजय पुराणिक, संघटनमंत्री रवींद्र अनासपुरे, खासदार रक्षा खडसे, भाजप जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक कांडेलकर, डॉ. राजेंद्र फडके या बैठकीला उपस्थित होते. त्यामुळे एकूणच या बैठकीचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसून आले.
दरम्यान, या बैठकीला कार्यकर्ते कमी संख्येने उपस्थित असल्याने नेत्यांनी बैठक आटोपशीर घेतली. उपस्थित कार्यकर्त्यांना पक्ष संघटन मजबुतीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले. लोकांपर्यंत जाऊन त्यांच्या अडीअडचणी समजून घेणे, पक्षाची ध्येयधोरणे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवणे, असे आवाहन नेत्यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून केले.