जळगाव - निकालापूर्वीच जळगाव लोकसभा निवडणुकीतील भाजप उमेदवार तसेच चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील उच्च न्यायालयाच्या दणक्यामुळे चांगेलच अडचणीत आले आहेत. माजी सैनिकाला मारहाण करत प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी आमदार पाटील यांच्यासह नऊ जणांविरुद्ध औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशावरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उन्मेष पाटील यांच्यासह नऊ जणांनी टाकळी येथील रहिवासी सोनू हिंमत महाजन यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप असून याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक झाली नसल्याने पोलिसही संशयाच्या घेऱ्यात आले आहेत. भाजप आमदार उन्मेष पाटलांविरुद्ध तीन वर्षांपूर्वी झालेल्या दरोडा तसेच प्राणघातक हल्ल्याप्रकरणी चाळीसगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीमा सुरक्षा दलात १७ वर्षे सेवा बजावून चाळीसगावात कुटुंबियांसह वास्तव्यास असलेल्या सोनू महाजन यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप उन्मेष पाटील यांच्यासह नऊ जणांवर आहे.
२ जून २०१६ रोजी संशयित आरोपी मुकुंद कोठावदे, भावेश कोठावदे, भारती कोठावदे, पप्पू कोठावदे, लक्ष्मीबाई कोठावदे, बबड्या शेख, भूषण उर्फ शुभम बोरसे, जितेंद्र वाघ तसेच आमदार उन्मेष पाटील यांनी तक्रारदार सोनू महाजन यांना घराच्या ताब्यावरून त्यांच्या घरी जाऊन शिवीगाळ तसेच मारहाण केली होती. यावेळी भावेश कोठावदे याने महाजन यांच्यावर तलवारीने वार करत त्यांना गंभीर जखमी केले होते. त्याचप्रमाणे संशयितांनी महाजन यांच्या खिशातून पैसे काढून घेत त्यांच्या पत्नी मनीषा महाजन यांच्या गळ्यातील सोन्याची पोतही हिसकावून नेल्याचा आरोप आहे. तीन वर्षांपूर्वी चाळीसगाव पोलिसांनी याबाबतची फिर्याद नोंदवून घेतली नव्हती. त्यामुळे महाजन यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे दरवाजे ठोठावले होते. न्यायालयाच्या आदेशाने अखेर उन्मेष पाटलांसह नऊ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्यात संशयित म्हणून आमदारांचाच सहभाग असल्याने पोलिसांवर देखील दबाव असल्याचे तक्रारदार महाजन यांचे म्हणणे आहे.
औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशावरून या प्रकरणाची चौकशी करून न्यायालयाला अहवाल सादर करण्याचे आदेशही पोलिसांना करण्यात आले आहेत. त्यानुसार पोलिसांनी चौकशी करून या प्रकरणातील नऊ जणांविरुद्ध मारहाण, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न तसेच दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. त्यात भाजप आमदार उन्मेष पाटील यांचाही समावेश आहे. दरम्यान, संशयित आरोपी हे भाजप आमदार तसेच आमदार समर्थक असल्याने सर्वसामान्यांच्या प्रकरणात कारवाईला आघाडी घेणाऱ्या पोलिसांनी याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक केलेली नाही. यामुळे स्थानिक पोलिसांवर आता आमचा विश्वास उरला नसून सीबीआयकडे हा गुन्हा वर्ग करण्यात यावा, अशी मागणी पीडित महाजन कुटुंबीयांनी केली आहे.