जळगाव - काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था अभ्यास न करता नापास होवून लेखणीला दोष देणाऱ्या बुध्दू मुलासारखी झाली आहे. सर्वसामान्य जनतेपासून तुटल्यानेच ते आता ईव्हीएमच्या नावाने बोंबा मारत आहेत, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगावात केली. भाजपची महाजनादेश यात्रा शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास जळगावात दाखल झाली. यावेळी सागरपार्क मैदानावर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.
या सभेला जलसंपदामंत्री गिरीश महाजन, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, खासदार उन्मेष पाटील, आमदार सुरेश भोळे, स्मिता वाघ, चंदुभाई पटेल, जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील आदी उपस्थित होते. या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा खरपूस समाचार घेत भाजप सरकारने गेल्या पाच वर्षात केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा मांडला.
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, एकीकडे आम्ही जनतेत जात आहोत. तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ईव्हीएमला शिव्या देत आहेत. याचे मला आश्चर्य वाटते. 2004 मध्ये ईव्हीएम आले. त्यानंतर 2014 पर्यंत काँग्रेसने ग्रामपंचायत ते संसदेपर्यंत सर्वच निवडणुका जिंकल्या. तेव्हा ईव्हीएम चांगले होते. पण आता वाईट का? यांना कोणीतरी सांगा की ईव्हीएम मते देत नाही. मते मतदार देतो. मतदाराच्या मनात घर केले तरच तुम्हालाही मते मिळतील. ईव्हीएमला शिव्या देऊन काही होणार नाही, असा टोला देखील त्यांनी विरोधकांना लगावला.
... म्हणून जनता यांना रोज नाकारतेय -
गेल्या पाच वर्षात केलेल्या भरीव विकासकामांचे मूल्यमापन जनतेने केले आहे. म्हणूनच जनता आमच्या पाठीशी आहे. मात्र, विरोधकांना हेच कळत नाही. जनतेने यापूर्वी विरोधकांना 15 वर्षे सत्ता दिली होती. मात्र, यांना सत्तेची इतकी मुजोरी झाली होती की यांनी स्वतःच्या पलीकडे दुसऱ्याचा विचारच केला नाही. जनतेची कामे करण्याऐवजी यांनी स्वतःची संस्थाने उभी केली. आजही विरोधी पक्षात गेल्यानंतर यांची सत्तेची मानसिकता सुटली नाही. हे विरोधी पक्षाची भूमिका पार पाडू शकले नाहीत. लोकांचा आवाज बनू शकले नाहीत. आजही हे आपल्या संस्थांमध्ये संस्थानिक बनून आपल्या संस्थांचा कारभार हाकत आहेत. म्हणूनच जनता यांना रोज नाकारत आहे, अशा शब्दांत फडणवीसांनी विरोधकांचा समाचार घेतला.
तुमच्या मेगा गळतीची चिंता करा -
विरोधकांची जनतेशी असलेली नाळ तुटली आहे. त्यामुळे ते ईव्हीएमला दोष देत आहेत. ईव्हीएमला दोष देण्यापेक्षा त्यांनी जनतेत जाण्याची गरज आहे. शरद पवार आणि अशोक चव्हाण हे भाजपच्या मेगा भरतीवर टीका करत आहेत. पण त्यांनी आमच्या मेगा भरतीची नाही तर त्यांच्याकडे सुरू असलेल्या मेगा गळतीची चिंता करावी. आपल्याकडे सुरू असलेली मेगा गळती कशी थांबेल, यासाठी त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणीही रहायला तयार नाही, अशी खिल्ली देखील मुख्यमंत्र्यांनी उडवली.
गरिबांचे कल्याण हाच भाजपचा अजेंडा -
गोरगरिबांचे कल्याण हाच भाजपचा अजेंडा आहे. गेल्या पाच वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली आम्ही महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले आहेत. पाच वर्षात महाराष्ट्र गुंतवणूक, उद्योग, रोजगार क्षेत्रात आघाडीवर आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात महाराष्ट्र 18 व्या क्रमांकावरून तिसऱ्या स्थानी आला. तसेच आरोग्याच्या क्षेत्रात सातव्या क्रमांकावरून तिसऱ्या स्थानावर आला. नीती आयोगाच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे, असे सांगत फडणवीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली बलशाली राष्ट्र व समृध्द महाराष्ट्र करण्यासाठी आपण पुन्हा एकदा भाजपला जनादेश द्यावा, असे आवाहन केले.
विरोधकांच्या 30 जागाही येणार नाहीत - गिरीश महाजन
जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनीही आपल्या भाषणात विरोधकांची खिल्ली उडवली. ते म्हणाले की आगामी विधानसभा निवडणुकीत विरोधकांच्या 30 जागाही येणार नाहीत. विरोधकांची तोंडे पाहायला देखील जनता तयार नाही. ही बाब लक्षात आल्यानेच विरोधकांनी आपल्या यात्रेत टीव्ही कलाकार असलेले खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना पुढे केले आहे. निदान त्यांना तरी पाहायला लोकं येत असल्याने सभेला गर्दी दिसत आहे, अशा शब्दांत महाजन यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले.