जळगाव - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात जळगावात असताना बुधवारी (8 जुलै) फडणवीस यांच्या शासकीय वाहन ताफ्यातील पोलीस व्हॅनने विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या वाहनाला धडक दिली होती. त्यात दरेकर यांना किरकोळ मार लागला होता. दरम्यान, गुरुवारी सकाळी खबरदारी म्हणून प्रवीण दरेकर यांनी जळगावातील एका खासगी रुग्णालयात तपासणी करून घेतली.
दिवंगत माजी खासदार हरिभाऊ जावळे यांच्या घरी भालोद येथे सांत्वनासाठी जात असताना जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावाजवळ पावसामुळे हा अपघात घडला होता. शासकीय वाहन ताफ्यातील पोलीस व्हॅनने प्रवीण दरेकर यांच्या वाहनाला धडक दिली होती. त्यात दरेकर यांच्या डाव्या खांद्याला किरकोळ दुखापत झाली होती. हरिभाऊ जावळे यांच्याकडे द्वारदर्शन आटोपून रात्री उशिरा जळगावात आल्यानंतर वैद्यकीय तपासणी करणे शक्य नव्हते. म्हणून दरेकर यांनी गुरुवारी सकाळी 9 वाजता जळगावातील एका खासगी रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून घेतली. दुखापत झालेल्या खांद्याचे एक्स रे काढण्यात आले. सुदैवाने, दुखापत मोठी नव्हती. तपासणी केल्यानंतर ते पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत दौऱ्यात सामील झाले.
दरम्यान, माझ्या वाहनाला छोटा अपघात घडला होता. त्यात डाव्या खांद्याला किरकोळ दुखापत झाली होती. खबरदारी म्हणून एक्स रे काढून घेतला, त्यात काहीही चिंता करण्यासारखं निघाले नाही. माझी प्रकृती ठणठणीत आहे, अशी माहिती दरेकर यांनी 'ई-टीव्ही भारत'शी बोलताना दिली.