जळगाव - जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील भाजपचे कार्यकर्ते तथा एरंडोल तालुका शेतकी संघाचे संचालक राजेंद्र रायभान पाटील (वय ५४) यांनी त्यांची पत्नी वंदनाबाई राजेंद्र पाटील (वय ४८), मुलगी ज्ञानल राजेंद्र पाटील (वय २१) यांच्यासह तापी नदीपात्रात उडी घेत आत्महत्या केली आहे. ही धक्कादायक घटना धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील दभाशी नजीकच्या पुलाजवळ घडली असून, ती आज (बुधवारी) सकाळी समोर आली. पाटील कुटुंबीय हे धरणगाव तालुक्यातील भोद येथील रहिवासी होते. तिघांचे मृतदेह नदी पात्रातून बाहेर काढण्यात आले आहेत.
राजेंद्र पाटील हे सोमवारी (दि. १७) पत्नी वंदनाबाई पाटील, मुलगी ज्ञानल पाटील यांच्यासह त्यांच्या (एमएच १९ एपी १०९४) क्रमांकाच्या टाटा इंडिका कारने अमळनेर तालुक्यातील भरवस येथे श्राद्धाच्या कार्यक्रमासाठी गेलेले होते. भरवस हे पाटील यांच्या सासरवाडीचे गाव आहे. त्याच दिवशी दुपारी साडेतीन वाजता ते घरी परत भोद येथे येण्यासाठी निघाले. मात्र, ते भोदला पोहचलेच नाहीत.
दभाशी पुलावर आढळली बेवारस कार -
दरम्यान, काल (दि. १८) दुपारी ४ वाजता शिंदखेडा तालुक्यातील दभाशी गावानजीक तापी नदीवर असलेल्या पुलाच्या परिसरात एका पुरुषाचा मृतदेह तापी नदीच्या पाण्यात तरंगताना परिसरातील नागरिकांना दिसला. याच वेळी एक कार बेवारस अवस्थेत पुलावर उभी होती. गाडीचा क्रमांक जळगाव जिल्ह्याच्या पासिंगचा होता. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात सोशल मीडियावर विविध ग्रुपमध्ये याबाबत चर्चा सुरू होती. जळगाव जिल्हा बँकचे संचालक संजय पवार यांनी ही गाडी ओळखल्यानंतर याबाबत धरणगाव तालुक्यात चर्चा सुरू झाली. ही गाडी राजेंद्र पाटील यांची असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शेतकी संघाचे अध्यक्ष रमेश पाटील यांनी भोद गावी धाव घेतली. त्यानंतर पुढे धक्कादायक घटनेची माहिती समोर आली.
हेही वाचा - जळगाव : कडक निर्बंधांमुळे सराफ व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ; दुकाने उघडण्यास परवानगी देण्याची मागणी
मुलीचाही मृतदेह आढळला -
भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष पी. सी. पाटील यांनी घटनेची माहिती मिळताच रात्री घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत राजेंद्र पाटील यांच्यासह त्यांची मुलगी ज्ञानल हिचाही मृतदेह तरंगतांना आढळून आला. मात्र, रात्र झाल्यामुळे या दोघांचे मृतदेह नदीच्या पाण्यातून बाहेर काढता आले नाहीत. बुधवारी सकाळीच हे मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आले. नंतर वंदनाबाई यांचादेखील मृतदेह तरंगताना आढळला. तिन्ही मृतदेह बाहेर काढून शिरपूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले.
सामूहिक आत्महत्येचे कारण अस्पष्ट -
राजेंद्र पाटील यांच्या कुटुंबीयांसोबतच्या आत्महत्येचे गुढ कायम आहे. काल सासरवाडीला अतिशय सामान्य परिस्थितीत घरून निघालेल्या या कुटूंबाने थेट तापी नदीत उडी का घेतली? त्यांनी आत्महत्या का केली? तसेच राजेंद्र पाटील हे अतिशय संयमी म्हणून परिचित असताना त्यांनी पत्नी व मुलीसह आत्महत्या करण्यासारखे टोकाचे पाऊल का उचलले असावे, असे प्रश्न आता उपस्थित झाले आहेत.
हेही वाचा - जळगावात 'म्यूकरमायकोसिस'वरील इंजेक्शनचा तुटवडा