जळगाव - जळगाव लोकसभा मतदारसंघाचे भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार उन्मेष पाटील यांनी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जळगाव नगरीचे ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानात नारळ अर्पण करून प्रचाराला सुरुवात केली. त्यांनी जुन्या जळगाव परिसरापासून प्रचाराला सुरुवात केली.
यावेळी पाटील म्हणाले, नववर्षाच्या निमित्ताने सर्वसामान्यांचा कार्यकर्ता म्हणून तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्र सशक्तीकरणासाठी हाती घेतलेल्या चळवळीतला अनुयायी म्हणून मी प्रचाराचा शुभारंभ केला आहे. भाजप व्यक्तींवर नव्हे, तर विचारांवर चालणारा पक्ष आहे. आज आम्ही भाजप नव्हे तर भारतासाठी काम करण्यासाठी सज्ज झालो आहोत, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.
यावेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, माजीमंत्री तथा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुरेश जैन, आमदार सुरेश भोळे, महापौर सीमा भोळे, बेटी बचाओ अभियानाच्या राष्ट्रीय समनव्यक डॉ. अस्मिता पाटील, महापालिका स्थायी समितीचे सभापती जितेंद्र मराठे, माजी महापौर विष्णू भंगाळे, सुनील महाजन, शरद तायडे आदींसह भाजप, सेना तसंच मित्रपक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.