जळगाव - राज्यातील शेतकऱ्यांचे असंख्य प्रश्न प्रलंबित आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना निवडणुकीच्या जाहीरनाम्यात ढाल करत सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारला आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा विसर पडला आहे. कर्जमाफीचा तिढा सुरूच आहे. शेतीला पुरेसा वीजपुरवठा होऊ शकत नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाहीत तर भाजपच्यावतीने राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भाजप नेते तथा माजी मंत्री गिरीश महाजन यांनी दिला.
हेही वाचा - अंडरवर्ल्डमधील मांडवली बादशहा सलीम महाराजला अटक
गिरीश महाजन सोमवारी सायंकाळी जळगावात आले होते. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, आम्ही सत्तेवर आल्यावर शेतकऱ्यांना चिंतामुक्त करू, असे या सरकारने जाहीर केले होते. मात्र, आज शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. अतिवृष्टीच्या नुकसानीचे पैसेही या सरकारने शेतकऱ्यांना दिलेले नाहीत. शेतकऱ्यांच्या बांधावर जावून आम्ही 25 हजार रुपये हेक्टरी भरपाई देवू, असे सरकारने जाहीर केले होते. पण आजपर्यंत एक दमडीही शेतकऱ्यांच्या हातात पडलेली नाही. शेतकरी कर्जमाफी ताबडतोब करू, असे सांगितले. परंतु, अद्यापही ही कर्जमाफी झालेली नाही. तांत्रिक मुद्यातच ती अडकलेली आहे, अशी टीकाही गिरीश महाजन यांनी केली.
राज्यभर विजेचा प्रश्न गंभीर-
आमचे सरकार असताना राज्यात वीज पुरवठा सुरळीत होत होता. मात्र, हे सरकार आल्यापासून राज्यात विजेचा प्रश्न गंभीर झालेला आहे. तब्बल चार-चार तास भारनियमन होत आहे. शेतकऱ्यांना ट्रान्सफार्मर मिळत नाही. ट्रान्सफार्मर मिळाले तर त्यासाठी ऑईल मिळत नाही. त्यामुळे अनेक समस्या आहेत. शेतकऱ्यांना पुरेशी वीज मिळत नसल्यामुळे शेतीपिकांना पाणी मिळत नाही. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे, असेही ते म्हणाले.
राज्यभर तीव्र आंदोलन छेडू-
राज्यातील हे सरकार अतिशय निष्क्रीय आहे. मराठवाड्यातील पाणीप्रश्नासाठी पंकजा मुंडेंना उपोषण करावे लागले आहे. आता शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी भाजप राज्यभर तीव्र आंदोलन करणार आहे. सरकारने आठवडाभरात जर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले नाहीत. तर, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात भाजपचे कार्यकर्ते आंदोलन करतील, असा इशाराही गिरीश महाजन यांनी दिला आहे.