जळगाव - बदलत्या काळाचा वेध घेत जळगावातील डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयाने विद्यार्थिनींना रोजगाराभिमुख शिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे, यासाठी केंद्र सरकारच्या स्टार्टअप या संकल्पनेच्या धर्तीवर 'उडाण' हा उपक्रम राबवला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून कौशल्यप्राप्त तसेच नव उद्योजकतेकडे झेप घेणाऱ्या होतकरू विद्यार्थिनींना वस्तुरूपी भागभांडवलाचे सहाय्य करून त्यांना आत्मनिर्भर करण्याचा अभिनव प्रयत्न महाविद्यालयाने केला आहे.
बेंडाळे महिला महाविद्यालयात कौशल्य विकासअंतर्गत फॅशन डिझायनिंग तसेच ब्युटी थेरेपी हे २ कौशल्य विकासाचे अभ्यासक्रम चालवले जातात. हे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करणाऱ्या विद्यार्थिनींना पाठबळ देण्यासाठी महाविद्यालयाने 'उडाण' हा उपक्रम राबवला आहे. प्रथमच फॅशन डिझायनिंग तसेच ब्युटी थेरेपी अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या २१ विद्यार्थिनींना शिवण यंत्र, ब्युटी पार्लरसाठी लागणारे विविध प्रकारचे साहित्य तसेच यंत्रसामुग्री देण्यात आली. लोकसहभागातून उभारलेल्या अडीच लाख रुपयांतून खरेदी केलेले साहित्य मदत म्हणून विद्यार्थिनींना देण्यात आले.
या कार्यक्रमाला कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. पी. पी. पाटील, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने, डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.एस. राणे, लेवा एज्युकेशनल युनियनचे अध्यक्ष डॉ. सुभाष चौधरी उपस्थित होते.
कौशल्य विकास प्रशाळा अंतर्गत २०१० पासून महाविद्यालयात कौशल्य विकासाचे विविध प्रकारचे अभ्यासक्रम राबवले जात आहेत. त्यातून आतापर्यंत जवळपास ६५० पेक्षा जास्त विद्यार्थिनी आत्मनिर्भर झाल्या आहेत. यापुढे कौशल्य विकासाचे विविध प्रकारचे ११ अभ्यासक्रम सुरू करण्याचा महाविद्यालयाचा मानस आहे. असे उपक्रम राबवणारे बेंडाळे महिला महाविद्यालय राज्यातील एकमेव आहे.