जळगाव- विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील ११ मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५४.५९ टक्के मतदान झाले होते. सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुमारे ६० टक्के मतदान झाल्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. जिल्ह्यातील विविध मतदान केंद्रांवर रात्री ८ वाजेपर्यंत मतदान सुरू होते. त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, सर्वपक्षीय मिळून १०० उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात सीलबंद झाले आहे.
जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांपासून शनिवारपर्यंत राजकीय पक्षांचे नेते व स्टार प्रचारकांच्या सभांचा धुमधडका सुरू होता. जिल्ह्यात गेल्या ८ दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपच्या स्मृती इराणी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अमोल मिटकरी, बहुजन वंचित आघाडीचे डॉ. प्रकाश आंबेडकर, शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांच्या सभा झाल्या.
जिल्ह्यात आज सकाळपासून अनेक भागात पावसाची रिपरिप सुरु होती. त्यामुळे सकाळी मतदारांचा मतदानासाठी उत्साह कमी होता. त्यानंतर दुपारी पाऊस ओसरल्याने मतदान केंद्रावर गर्दी वाढू लागली होती. सायंकाळी ४ वाजेपासून तर मतदान केंद्रावर रांगा वाढल्या होत्या. सायंकाळी ६ वाजेपर्यंत अनेक मतदार केंद्राच्या आवारात पोहचल्यानंतर गेट लावून आवारात असलेल्या मतदारांना मतदान करू देण्यात येत होते. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत जिल्ह्यातील काही केंद्रांवर मतदान सुरू होते. रात्री उशिरापर्यंत मतदानाची अंतिम आकडेवारी प्राप्त झालेली नव्हती.
हेही- सजविलेल्या बैलगाडीतून येत सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटलांनी केले मतदान
मतदारसंघ | टक्केवारी |
चोपडा | ६० टक्के |
रावेर | ६७ टक्के |
भुसावळ | ४६ टक्के |
जळगाव शहर | ४५ टक्के |
जळगाव ग्रामीण | ५८ टक्के |
अमळनेर | ६२ टक्के |
एरंडोल | ६० टक्के |
चाळीसगाव | ५८ टक्के |
पाचोरा ५७ टक्के | ५७ टक्के |
जामनेर | ६३ टक्के |
मुक्ताईनगर | ६४ टक्के |
जळगाव जिल्हा | ६० टक्के |