जळगाव - जगभरात कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने फैलावत आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून, केंद्र सरकारने 'आरोग्य सेतू' अॅप उपलब्ध करून दिले आहे. या अॅपच्या माध्यमातून नागरिकांना कोरोनाबाबत इत्थंभूत माहिती व्हावी, हा त्यामागचा उद्देश आहे. मात्र, काही पाकिस्तानी हॅकर्सने भारत सरकारच्या 'आरोग्य सेतू' अॅपचे क्लोनिंग करत त्याच नावाने एका बनावट अॅपची निर्मिती केली आहे. बनावट अॅपच्या माध्यमातून पाकिस्तानी हॅकर्स भारतीय सैन्य दलासह नागरिकांची माहिती चोरत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे नागरिकांनी भारत सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावरुनच 'आरोग्य सेतू' अॅप डाऊनलोड करावे, असे आवाहन महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेल विभागाने केले आहे.
काही पाकिस्तानी हॅकर्सने भारतीयांची व्यक्तिगत माहिती चोरण्यासाठी भारत सरकारच्या 'आरोग्य सेतू' अॅपच्या नावाने क्लोनिंगच्या माध्यमातून एक बनावट अॅप तयार केले आहे. हे ऍप प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे यूट्यूब, फेसबुक, व्हाट्सएपवर देखील हॅकर्सने त्याची लिंक शेअर केली असून, त्या लिंकवर क्लिक केल्यास ते अॅप संबंधित व्यक्तीच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड होते. अॅप डाऊनलोड केल्यानंतर एका क्लिकवर संबंधित व्यक्तीच्या मोबाईलचा अॅक्सेस पाकिस्तानी हॅकर्सकडे जातो. त्यानंतर हॅकर्स त्या व्यक्तीच्या मोबाईलमधील सर्व माहिती, पासवर्ड सहज चोरू शकतात.
मोबाईलमधील फेसबुक, व्हाट्सएप तसेच ई मेल्स अकाउंट, बँकिंग डिटेल्स, यासह विविध अॅपवरील लॉग इनची माहिती त्या हॅकर्सला मिळते. अशा माध्यमातून राज्यातील काही लोकांची माहिती चोरीला गेल्याचे महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेल विभागाच्या मुंबई मुख्यालयाच्या लक्षात आले. त्यानंतर सायबर सेल विभागाने राज्यभर तातडीने उपाययोजना करायला सुरुवात केली आहे. प्रत्येक जिल्ह्यातील सायबर सेल विभागाला या प्रकाराबाबत कळविण्यात आले असून आपल्यास्तरावर उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सायबर सेल विभागाचे आवाहन -
हा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांच्या सायबर सेल विभागाने नागरिकांना जाहीर आवाहन केले आहे. 'आरोग्य सेतू' अॅप डाऊनलोड करायचे असल्यास ते भारत सरकारच्या https://www.mygov.in/ या अधिकृत संकेस्थळावरूनच डाऊनलोड करावे. हे अॅप प्ले स्टोअरवर त्याचप्रमाणे यू ट्यूब, फेसबुक, व्हाट्सएपवरील लिंकवरून डाऊनलोड करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. याआधी जर हे अॅप प्ले स्टोअरवरून त्याचप्रमाणे यूट्यूब, फेसबुक किंवा व्हाट्सएपवरील लिंकवरून डाऊनलोड केले असल्यास त्वरित अनइंन्स्टॉल करावे, असेही आवाहन सुरक्षेच्या दृष्टीने करण्यात आले आहे.
...तर लगेच सायबर सेलशी संपर्क साधा- पोलीस निरीक्षक बळीराम हिरे
आपल्या जिल्ह्यात अद्याप अशा प्रकारे फसवणूक झाल्याचा किंवा गोपनीय माहितीचा अयोग्य पद्धतीने वापर झाल्याची तक्रार प्राप्त नाही. मात्र, मुंबईत असे प्रकार घडले असून त्याआधारे महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेल मुख्यालयातून आम्हाला खबरदारीच्या तसेच जनजागृती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. खबरदारी म्हणून नागरिकांनी भारत सरकारच्या अधिकृत संकेस्थळावरूनच आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करावे, असे आवाहन जळगाव पोलीस दलाच्या सायबर सेल विभागाचे पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांनी केले आहे.
हेही वाचा - जिल्हा रुग्णालयाच्या अधिष्ठातांविरुद्ध मुख्यमंत्र्यांकडे तक्रार; कर्तव्यात कसूर करत असल्याचा आरोप
हेही वाचा - राजकीय भानगडीत न पडता, महाराष्ट्र नव्याने उभा करण्यासाठी काम करायला हवं- नाना पटोले