जळगाव - बोदवड नगरपंचायत निवडणुकीत १७ पैकी ९ जागांवर विजय मिळवत शिवसेनेने बोदवड नगरपंचायतीवर एकहाती सत्ता मिळवली होती. शुक्रवारी या नगरपंचायतीसाठी नगराध्यक्ष ( Bodwad Nagarpanchayat President Anada Patil ) पदाची निवडप्रक्रिया पार पडली. यात नगराध्यक्षपदाची माळ आनंद रामदास पाटील यांच्या गळ्यात, तर उपनगराध्यक्षपदी रेखा संजय गायकवाड ( Bodwad Nagarpanchayat President ) यांची निवड झाली आहे. दरम्यान, नगराध्यक्ष निवडीच्या वेळी भाजपच्या नगरसेवकाने शिवसेनेला साथ दिल्याने आगामी काळातील निवडणुकांमध्ये जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलाचे संकेत व्यक्त केले जात आहेत.
शिवसेनेचा १७ पैकी नऊ जागांवर विजय -
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे, भाजपचे गिरीश महाजन, शिवसेनेचे पालकमंत्री गुलाबराव पाटील या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याने संपूर्ण जिल्ह्यासह महाराष्ट्राचे लक्ष बोदवड नगरपंचायत निवडणुकीच्या निकालाकडे लागलं होतं. अंत्यत चुरशीच्या झालेल्या बोदवड नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीला धूळ चारत शिवसेनेनं नगरपंचायतीवर भगवा फडकावला आहे. या निवडणुकीत शिवसेनेने १७ पैकी नऊ जागांवर विजय मिळवला आहे, तर ईश्वरचिचिठ्ठीने एक जागा भाजपला मिळाली होती. तसेच राष्ट्रवादीला केवळ ७ जागांवर विजय मिळवता आला होता.
भाजपची सेनेला साथ -
बोदवड नगरपंचायतीत सुरूवातीपासूनच भाजप सेनेची छुपी युती असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांनी केला होता. त्यातच अाता बोदवड नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी भाजपने शिवसेनेचा हात धरल्यामुळे खडसेंच्या वक्तव्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे बोलले जात आहे. राज्यात जरी भाजप विरोधात असले तरी जळगावातील बोदवड नगरपंचायत निवडणुकीत ईश्वरचिठ्ठीने निवडून आलेल्या भाजपच्या नगरसेवकाने शिवसेनेचा हात धरला आहे. भाजपचे उमेदवार विजय शिवराम बडगुजर हे शिवसेनेसोबत गेले आहेत.
जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलाचे संकेत -
नगराध्यक्ष पदाच्या निवडीनंतर शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, बोदवड करांनी शिवसेनेवर विश्वास दाखवला आहे, तो विकासकामांच्या माध्यमातून सार्थ करून दाखवणार आहे. बोदवडच्या विकासासाठीच भाजप शिवसेनेसोबत आली आहे. जिल्ह्यातील आगामी निवडणुकांमध्ये भाजप सेनासोबत राहील का? याबाबत विचारले असता त्यांनी भाजपची भाजपला विचारा ते तयार असतील तर आम्ही तयार असल्याचे ते म्हणाले. आमदार चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यामुळे त्यामुळे जिल्ह्यातील आगामी काळातील निवडणुकांमध्ये भाजप सेनेची युती होऊन राजकीय समीकरणे बदलाचे संकेत मिळाले आहेत. तर भाजपचे विजयी उमेदवार विजय बडगुजर यांना विचारलं असता त्यांनी बोदवड शहराच्या विकासासाठी शिवसेनेसोबत गेल्याचे सांगितले. राज्यात जरी भाजप विरोधात असली तरी मात्र मला शहराच्या विकासासाठी शिवसेनेसोबत जाणे पसंत पडल्याचेही ते म्हणाले.
हेही वाचा - Ahmedabad Bomb Blast : गुजरातमध्ये तब्बल 38 दोषींना फाशीची शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय