जळगाव - जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण समाधानकारक राहिले. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू झालेला पाऊस अजूनही सुरूच आहे. दमदार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच मोठे व मध्यम सिंचन प्रकल्प तुडूंब भरले आहेत. यामुळे जळगावचा पाणीप्रश्न निकाली निघाला आहे.
जळगाव जिल्ह्यात हतनूर, वाघूर आणि गिरणा हे तीन मोठे तर तेरा मध्यम सिंचन प्रकल्प आहेत. मागील वर्षी समाधानकारक पाऊस न पडल्याने या सर्वच प्रकल्पांत अत्यल्प पाणीसाठा होता. मात्र, यावर्षी दमदार पावसामुळे मागचा अनुशेष भरुन निघाला आहे.
हेही वाचा - जामनेर विधानसभा मतदारसंघ : भाजपचे 'संकटमोचक' मात्र विरोधकांसाठी संकट ?
पुढील काही दिवस पावसाचा अंदाज असल्याने १०० टक्के भरलेल्या प्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांपैकी एक असलेला गिरणा प्रकल्प १२ वर्षांनंतर १०० टक्के भरला आहे. त्याचप्रमाणे जळगाव आणि जामनेरसाठी असलेला वाघूर प्रकल्प ९३ टक्के भरला आहे.
जिल्ह्यातील १३ मध्यम प्रकल्पांपैकी सुकी, अभोरा, मंगरूळ, हिवरा, तोंडापूर आणि बोरी हे प्रकल्प १०० टक्के भरले आहेत.