जळगाव - कोरोनाचा संसर्ग आता काही प्रमाणात नियंत्रणात येत असल्याने राज्य सरकारच्यावतीने टप्प्याटप्प्याने 'अनलॉक' केले जात आहे. प्रत्येक क्षेत्रात सूटही दिली जात आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील मंदिरे, धार्मिकस्थळे देखील उघडण्यात यावीत, हरिपाठ, कीर्तन तसेच समाजप्रबोधनपर कार्यक्रमांना सशर्त परवानगी देण्यात यावी, अशी एकमुखी मागणी अखिल भारतीय वारकरी मंडळाच्यावतीने करण्यात आली.
धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे अखिल भारतीय वारकरी मंडळाच्यावतीने आयोजित खान्देश विभागस्तरीय विचारविनिमय व पदनियुक्ती सोहळा आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या सोहळ्यात वारकऱ्यांशी निगडित समस्या, अडीअडचणींवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना राज्यातील मंदिरे व धार्मिक स्थळे उघडण्याबाबत साकडे घातले.
'या' विषयांवर झाले सोहळ्यात विचार मंथन -
या सोहळ्यात अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मनोगते व्यक्त केली. त्यात विविध प्रकारच्या विषयांवर मंथन झाले. कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर मार्च महिन्यापासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यामुळे सर्वच क्षेत्रांवर निर्बंध आले. हरिपाठ, कीर्तन तसेच समाजप्रबोधनपर कार्यक्रमांवर बंदी आली. त्यामुळे वारकऱ्यांना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पाहता-पाहता सात महिन्यांचा काळ याच पद्धतीने गेला. त्यामुळे किर्तनकार अधिक अडचणीत सापडले आहेत. कीर्तन, समाजप्रबोधनपर कार्यक्रमांच्या माध्यमातून मिळणाऱ्या मानधनावर बहुसंख्य किर्तनकारांचा उदरनिर्वाह चालतो. मात्र, कोरोनामुळे जाहीर कार्यक्रमच बंद असल्याने ते संकटात सापडले आहेत. अशा परिस्थितीत राज्य सरकारने किर्तनकारांना सानुग्रह अनुदान द्यावे, अनलॉकच्या अनुषंगाने आता राज्यातील मंदिरे, धार्मिक स्थळे उघडण्यात यावीत त्याचप्रमाणे हरिपाठ, कीर्तन तसेच समाजप्रबोधनपर कार्यक्रमांना सशर्त परवानगी देण्यात यावी, याशिवाय जिल्हास्तरावर वारकऱ्यांसाठी हक्काचे वारकरी भवन उभारावे, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
वारकऱ्यांनी संघटित व्हावे -
या सोहळ्यात अखिल भारतीय वारकरी मंडळाच्यावतीने वारकऱ्यांना संघटित होण्याचे आवाहन करण्यात आले. संघटनांच्या माध्यमातून वारकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यास मदत होऊ शकते, असेही यावेळी वारकरी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.