जळगाव - जिल्ह्यातील एरंडोल येथील अॅड. ओम त्रिवेदी यांचा मुलगा आकाश त्रिवेदी हा विज्ञान शाखेतील जेईई अॅडव्हान्समध्ये भारतातून २२६व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. त्याला आयआयटी मुंबई, दिल्ली, मद्रास, कानपूर किंवा खडकपूर येथे उच्च शिक्षणाची संधी मिळू शकणार आहे. जेईई अॅडव्हान्स परीक्षेत याप्रमाणे यश मिळवणारा आकाश हा खान्देशातील एकमेव विद्यार्थी आहे.
जेईई परीक्षेत गुणवत्ता निश्चित झाल्यानंतर अनेक विद्यार्थी आयआयटी करून युरोप किंवा अमेरिकेत स्थायिक होतात. तेथे त्यांना विविध प्रकारच्या अभ्यास व कार्याची संधी मिळते. मात्र, आकाशला भारतातच राहून संशोधन क्षेत्रात काम करीत देशाची सेवा करायची आहे. तसा मनोदय त्याने बोलून दाखवला आहे. आकाश चौथीपर्यंत एरंडोल येथील रा.ति. काबरे विद्यालयाच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिकला. नंतर इयत्ता सातवी पर्यंत जळगाव येथील काशिनाथ पलोड इंग्लिश स्कूलमध्ये शिकला. त्यानंतर त्याने कोटा येथे १२ वी पर्यंत शिक्षण घेतले.
यापूर्वीही आकाशने अनेक परीक्षांमध्ये यश मिळवले आहे. सातवीत असताना त्याने माध्यमिक शालांत शिष्यवृत्ती परीक्षेत महाराष्ट्रात ९वा क्रमांक मिळवला होता. आठवीत असताना त्याने क्लासमेट स्पेलबी या राष्ट्रीय परीक्षेत अंतिम फेरीपर्यंत धडक मारली होती. हा शो डिस्कवरी चॅनेलवरून जगभर प्रसारित झाला होता. १०वीत असताना केंद्र शासनातर्फे झालेल्या राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेत ३० वा क्रमांक मिळवून तो शिष्यवृत्तीस पात्र ठरला होता. ११ वीत असताना किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजनेच्या परीक्षेत अंतिम फेरीत उत्तीर्ण होऊन शिष्यवृत्तीस पात्र ठरला होता. आकाशने शालेय शिक्षणात ऑलिम्पियाड, जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय अशा अनेक स्पर्धेत अनेक बक्षिसे मिळवली आहेत.
हेही वाचा- खडसे राष्ट्रवादीत जाणार? आज मुंबईत शरद पवारांची भेट घेण्याची शक्यता