जळगाव : विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी जळगावमध्ये बोलताना विविध मुद्द्यांवरून भाजप आणि शिंदे सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, शासन आपल्या दारी या योजनेवर प्रचंड खर्च होत आहे. कोल्हापूर, पालघरमध्ये जे झाले त्यात सगळी यंत्रणा अडकली आहे. निव्वळ राजकारण सुरू आहे. विरोधी असल्याने आम्हाला निधी दिला जात नाही, आमची काम मंजूर केली जात नाही, असेही अजित पवार म्हणाले.
महाराष्ट्र हे पुरोगामी विचारांचे राज्य : समाजा-समाजामध्ये तेढ निर्माण केली जात आहे का? अशी शंका उपस्थित होत आहे. राज्यात अशा अनेक घटना घडत आहेत. नुकतीच कोल्हापूरमध्ये देखील अशीच एक घटना घडली. महाराष्ट्र हे पुरोगामी विचारांचे राज्य आहे. मात्र, त्यालाच गालबोट लावण्याचे काम सुरू आहे. सरकार यामध्ये हस्तक्षेप करायला तयार नाही. महागाई, बेरोजगारी वाढत चालली आहे, भाजीपाल्याला देखील भाव नाही. सरकार 20 लोकांचे आहे. ते म्हणता आम्ही केपेबल आहोत. तीन-तीन, चार-चार खाते एक एकाला दिले आहे. त्यामुळे जिल्ह्यांना पाहिजे तितका न्याय दिला जात नाही, असे पवार म्हणाले.
राज्यात प्रचंड भ्रष्टाचार सुरू : राज्याचा पनन विभाग कशासाठी आहे? भाव पडतो तेंव्हा त्यांनी पुढे यायला हवे. ग्राहक उत्पादक यांच्यातला समन्वय ठेवायला हवा. खतांच्या किमती वाढवल्या जात आहे, त्याकडे लक्ष द्यायला हवे, असेही ते म्हणाले. राज्यात प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे. अनेक मंत्र्यांवर छापे मारले जात आहे. बदल्यांचे रेट सुरू आहे. आमदार नाराज नको म्हणून काहीही सुरू आहे, नियमात असो नसो मंजुरी दिली जात आहे, असेही अजित पवार म्हणाले.
हेही वाचा :