जळगाव - पीएनबी घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सी याला डॉमेनिका या देशात अटक करण्यात आली आहे. आता भारताने राजकीय मुत्सद्देगिरी वापरून चोक्सीची हकालपट्टी करण्यास अँटिग्वा देशाला भाग पाडावे, असे मत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले आहे. अॅड. उज्ज्वल निकम हे गुरुवारी जळगावात आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी आपले मत मांडले.
अॅड. निकम पुढे म्हणाले, पंजाब नॅशनल बँकेला कोट्यवधी रुपयांचा चुना लावणारा ठगसेन मेहुल चोकसी याने कातडी बचावासाठी अँटिग्वा देशाचे राष्ट्रीयत्व घेतले. सीबीआयची इंटरपोल नोटीस जारी होताच तो डॉमेनिका देशात पळून गेला. त्यावेळी अँटिग्वाच्या पंतप्रधानांनी मेहुल चोकसीला डॉमेनिकातच अडकवून ठेवले जाईल. तेथून हद्दपार केल्यावर त्याला भारताकडे सुपूर्द केले जाईल, असे जाहीर केले होते. पण ही कारवाई पूर्णपणे डॉमेनिका देशावर अवलंबून आहे. माझ्या मते डॉमेनिका देश मेहुल चोकशीला अँटिग्वात हद्दपार करेल. मग भारताला गुन्हेगार हस्तांतर प्रक्रिया करावी लागेल, असे अॅड. निकम यांनी सांगितले.
चोक्सीला हद्दपार करणे गरजेचे -
अँटिग्वा, डॉमेनिका आणि भारत या तीन देशांमध्ये गुन्हेगार हस्तांतर कायदा अस्तित्वात नाही. त्यामुळे मेहुल चोक्सीला हद्दपार करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे भारताने राजकीय मुत्सद्देगिरी वापरून अँटिग्वाला मेहुल चोक्सीची हकालपट्टी करण्यास भाग पाडायला हवे, असेही अॅड. निकम म्हणाले.