जळगाव - आठ वर्षीय अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करून तिचा खून केल्याचा दोषारोप सिद्ध झाल्याने जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा येथील समाधान लोटन बडगुजर (वय ३४) या आरोपीस मंगळवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
या खटल्याची थोडक्यात हकीकत अशी की, आरोपी समाधान बडगुजर याचा एक मित्र जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत होता. या मित्राची बहीण विधवा होती. या विधवा महिलेच्या आठ वर्षीय बालिकेचे अपहरण करत समाधान याने तिच्यावर अत्याचार केले होते. त्यानंतर बालिकेला विहिरीत फेकून देत तिचा खून केला होता. समाधान हा संबंधित विधवा महिलेकडे येत जात होता. ही महिला काही कामानिमित्त बाहेरगावी गेलेली असताना १४ मे २०१६ रोजी सायंकाळी ६ वाजता समाधान तिच्या घरी गेला. त्याने महिलेसह तिच्या भावाची मुले अशा एकूण चार जणांना लस्सी पाजण्याच्या बहाण्याने घराबाहेर नेले. लस्सी पाजल्यानंतर इतर तिघांना ५० रुपये देऊन रिक्षाने परत घरी पाठवून दिले. आठ वर्षीय मुलीस घेऊन तो निघून गेला होता. दरम्यान, महिला घरी आल्यानंतर मुलगी घरात नसल्यामुळे तिने विचारपूस केली. यावेळी बालिकेसोबत घडलेला गैरप्रकार समोर आला होता.
महिलेने दिलेल्या तक्रारीवरून समाधान विरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. समाधान बेपत्ता होता. यानंतर १८ मे २०१६ रोजी पिंप्राळा शिवारातील अनिल भीमसिंग पाटील यांच्या शेतातील विहिरीत आठ वर्षीय बालिकेचा मृतदेह आढळला होता. पाटील यांनी ही माहिती रामानंदनगर पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान, या बालिकेची ओळख पटवण्यासाठी तिच्या विधवा आईस पोलिसांनी बोलावले होते. पायातील काळा दोरा, लॅगीज व टी-शर्टच्या रंगावरून तिची ओळख पटवण्यात आली. यानंतर समाधानच्या विरुद्ध बलात्कार व खुनाचे कलम देखील वाढवण्यात आले होते. एमआयडीसी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल हाेता.
काही दिवसातच पोलिसांनी समाधान याला अटक केली. यानंतर गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायाधीश पी. वाय. लाडेकर यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली. सरकार पक्षाने एकूण २३ साक्षीदार तपासले. सुनावणीत दोषारोप सिद्ध झाल्याने न्यायालयाने समाधान याला अपहरण व खूनाच्या गुन्ह्यात दोषी धरुन जन्मठेप व २५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. सरकार पक्षातर्फे अॅड. शीला गोडंबे यांनी काम पाहिले. दरम्यान, दंडाची रक्कम पीडितेच्या आईला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. विशेष म्हणजे, या खटल्यात काही साक्षीदार फितूर झाल्यामुळे त्यांचे जबाब घेणाऱ्या न्यायाधीशांनाच साक्षीदार करण्यात आले होते.