जळगाव - पालकमंत्र्यांच्या दुष्काळी दौऱ्यात सामिल होण्यासाठी मुंबईहून जळगावला निघालेल्या जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांच्या खासगी वाहनाला अपघात झाला. ही घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास ओझरजवळ घडली. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही. मात्र, पाटील यांच्या कारचे मोठे नुकसान झाले आहे.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा आज जिल्ह्यात दुष्काळी दौरा असल्यामुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील या त्यांचे पती मच्छिंद्र पाटील आणि परिवारासह मुंबईहून रात्री १२ वाजता जळगावला येण्यासाठी निघाले होते. दरम्यान, नाशिकजवळील ओझर गावाजवळ गतिरोधक असल्याने कारचालकाने वेग कमी केला. त्याचवेळी मागे असलेल्या ट्रकने कारला जोरात धडक दिली. त्यात कारचा मागचा भाग पूर्ण चेपला गेला.
मागच्या सीटवर बसलेल्या उज्ज्वला पाटील यांचा भाचा सुदैवाने बचावला. किरकोळ दुखापत वगळता कुणासही मोठी दुखापत झाली नाही. या अपघातानंतर ओझर पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे.
वर्षभरात तीनवेळा अपघात -
उज्ज्वला पाटील यांच्या कारचा वर्षभरात तिसऱ्यांदा अपघात झाला आहे. या अपघातात त्या जखमी झालेल्या नाहीत.