जळगाव - यावल शहरातील एका शेतमजुराची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. अवघ्या ५ दिवसाच्या संसारानंतर मजुराच्या पत्नीने ३१ हजार ३०० रुपयांच्या ऐवजासह पोबारा केला आहे. ही घटना ७ ते १२ नोव्हेंबरदरम्यान घडली. या प्रकरणी नववधूसह चौघाविरुद्ध आज यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. डिगंबर देविदास फेगडे (वय ३३ रा. महाजन गल्ली) असे फसवूक झालेल्या तरुण शेतमजुराचे नाव आहे.
फेगडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ६ नोव्हेंबरला तालुक्यातील अकलूद येथे फेगडे यांना एका इसमाने लग्नासाठी मुलगी बघायला बोलवले होते. तेथे बहिणाबाई रावसाहेब अंबुरे (रा. दर्गा रोड, परभणी) हिने साहेबराव कोळी, अनिल परदेशी यांच्या समक्ष सोनाली कुऱ्हाडे (रा. जालना) हिला फेगडे यांना दाखवले व लग्नाकरिता ६३ हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. तेव्हा फेगडे यांनी पैसे दिले आणि ७ नोव्हेंबर रोजी महाजन गल्लीतील श्री. विठ्ठल मंदिरात लग्नसोहोळा पार पडला.
मंदिरात जाते असे सांगत केला पोबारा
पाच दिवसाच्या संसारानंतर १२ नोव्हेंबरला दुपारी, मंदिरात जाते असे सांगत सोनाली हीने पोबारा केला. घरातून जाताना लग्नावेळी तिने अंगावर घातलेले २५ हजाराचे दागिने, घरातील ५ हजार रुपयांच्या नव्या साड्या, मोबाईल असा एकूण ३१ हजार ३०० रुपयांचा ऐवजही ती घेऊन गेली. हा प्रकार लक्षात येताच तिचा सर्वत्र शोध सुरू झाला. मध्यस्थी असलेल्या सर्वांना विचारपूस करण्यात आली. मात्र, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने फेगडे यांनी आज यावल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी बहिणाबाई रावसाहेब अंबुरे, साहेबराव कोळी, अनिल परदेशी व नववधू सोनाली कुऱ्हाडे (रा. जालना) यांनी संगनमताने दलाली म्हणून ६३ हजार व सोनाली कुऱ्हाडे हिने नेलेले ३१ हजार ३०० रुपयांचा ऐवज, असा एकूण ९४ हजार ३०० रुपयांची फसवणूक केल्याने या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका दलाल महिलेस ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा - दिवाळी काळातील हलगर्जीपणा जळगावकरांना भोवणार? कोरोनाच्या रुग्णसंख्येत होतेय वाढ