जळगाव - जिल्हा रुग्णालयाच्या भोंगळ कारभाराचे अनेक किस्से दररोज समोर येत आहेत. कोरोनासारख्या युद्धजन्य परिस्थितीतही आरोग्य यंत्रणेतील अधिकाऱ्यांना सार्वजनिक आरोग्याचे गांभीर्य नसल्याची संतापजनक बाब बुधवारी राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत समोर आली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोविड सेंटरमध्ये 80 संशयित रुग्णांचे कोरोना चाचणीसाठी स्वॅब घेण्यात आले होते. मात्र, आरोग्य यंत्रणेच्या भोंगळ कारभारामुळे हे स्वॅबच हरवले आहेत. ते कोणत्या प्रयोगशाळेत पाठवले होते? प्रयोगशाळेत पाठवल्यानंतर त्यांचे अहवाल आलेत का? याबाबतची कोणतीही माहिती यंत्रणेकडे नाही. याबाबत खुद्द जिल्हा शल्यचिकित्सकांनी आरोग्य मंत्र्यांसमोर कबुली दिली. माजी मंत्री गिरीश महाजन यांनीही या विषयावर तीव्र नाराजी व्यक्त करत राज्य सरकारवर अकार्यक्षमतेचा आरोप केला.
हेही वाचा... जळगावातील कोरोनाचा मृत्यूदर कमी करण्यासाठी मुंबईच्या धर्तीवर टास्क फोर्स : राजेश टोपे
जळगाव जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राजेश टोपे बुधवारी जळगावच्या दौऱ्यावर आलेले होते. यावेळी त्यांनी जिल्हा नियोजन भवनात प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. या बैठकीत आरोग्य यंत्रणेच्या भोंगळ कारभाराचे अनेक मुद्दे समोर आले. माजी मंत्री गिरीश महाजन यांनी जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या, मृत्यूदर तसेच कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये असलेल्या अडचणींच्या मुद्यांकडे आरोग्य मंत्र्यांचे लक्ष वेधले. जिल्हा प्रशासन कोरोनाचे नियंत्रण करण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला.
जिल्ह्यातील संसर्गाचा वेग पाहता स्वॅब घेण्याची कार्यवाही संथगतीने सुरू असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी जिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये घेण्यात आलेले 80 संशयित रुग्णांचे स्वॅब गायब झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली. कोरोनासदृश्य आजाराची लक्षणे दिसून आल्याने या 80 रुग्णांना कोविड सेंटरमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांना दाखल केले, त्यावेळी त्यांचे स्वॅबही घेतले होते. मात्र, ते कोणत्या प्रयोगशाळेत पाठवले होते? प्रयोगशाळेत पाठवल्यानंतर त्यांचे अहवाल आलेत का? याबाबतची कोणतीही माहिती नसल्याची कबुली डॉ. चव्हाण यांनी बैठकीत दिली. या मुद्यावरून आरोग्य मंत्र्यांनी आरोग्य यंत्रणेतील अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
दरम्यान, आढावा बैठक आटोपल्यानंतर गिरीश महाजन यांनी कोरोनाच्या मुद्यावर पत्रकारांशी बोलताना स्थानिक प्रशासन आणि राज्य सरकारवर आगपाखड केली. कोरोनाच्या बाबतीत राज्य सरकारची भूमिका उदासीन आहे. सरकारला कोणत्याही प्रकारचे गांभीर्य नाहीये. म्हणूनच परिस्थिती हाताबाहेर गेली आहे, असा आरोप गिरीश महाजन यांनी यावेळी केला. जळगाव जिल्ह्यात तर अतिशय बिकट परिस्थिती आहे. कोरोना संशयित रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका मिळत नाही. अनेक संशयितांच्या स्वॅबचे अहवाल 12 ते 15 दिवस मिळत नाहीत. त्यामुळे संसर्ग वाढत आहे. आम्ही राजकारण बाजूला ठेऊन कोरोनाच्या लढ्यात प्रशासनाला मदत करत आहोत. मात्र, सरकार गंभीर नसल्याचेही ते म्हणाले.