जळगाव - दिवसेंदिवस जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. जळगाव शहरासह भुसावळ आणि अमळनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रूग्ण आढळत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने 7 ते 13 जुलै दरम्यान पुन्हा एकदा लॉकडाऊन घोषित केला आहे. जळगाव शहरासह भुसावळ आणि अमळनेर तालुक्यात हा लॉकडाऊन असणार आहे. लॉकडाऊनमध्ये मेडिकल्स आणि जीवनावश्यक बाब म्हणून दूध खरेदी-विक्रीला परवानगी आहे. इतर सर्व गोष्टींना परवानगी नाकारण्यात आली आहे. सोमवारी रात्री 12 वाजेपासून लॉकडाऊन सुरू झाला आहे.
आज सकाळी सहा वाजल्यापासूनच जळगावातील प्रमुख चौकांसह रस्त्यांवर ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रत्येक चौकात येणाऱ्या जाणाऱ्यांची कसून चौकशी केली जात आहे. दुचाकी तसेच चारचाकी वाहनांनी फिरण्यास बंदी घालण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थितीत दुचाकीवरून केवळ एकाच व्यक्तीला जाता येणार आहे. नागरिकांना ते राहत असलेल्या प्रभागातच दूध व मेडिकल इमर्जन्सी म्हणून गोळ्या-औषधे खरेदी करता येणार आहेत. 13 जुलैपर्यंत हा लॉकडाऊन सुरू राहणार असल्याने नागरिकांनी घरातच थांबून कोरोनाची साखळी तोडण्यास प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
लॉकडाऊन काळात विना परवानगी तसेच विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. शहरातील सुभाष चौक, दाणा बाजार, बळीराम पेठ, फुले मार्केट, सेंट्रल फुले मार्केट, गोलाणी मार्केट, भास्कर मार्केट परिसरातील सर्वच दुकाने बंद आहेत. आज सकाळच्या सत्रात लॉकडाऊनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले.
लॉकडाऊन असलेल्या तीनही ठिकाणी कृषी मालाच्या खरेदी आणि विक्रीचे व्यवहार सशर्त सुरू असणार आहेत. त्यासाठी संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांकडे जबाबदारी देण्यात आली आहे. थेट शेतमाल विक्रीसाठी शेतकऱ्यांना बंदी घातली आहे. कृषी विभागाकडे नोंदणी केलेले शेतकरी गट, आत्मा विभागाच्या माध्यमातून शेतीमाल थेट नागरी वसाहतीत नियमांचे पालन करून विकता येणार आहे. जळगाव जिल्ह्यात सद्यस्थितीत साडेचार हजारांहून अधिक कोरोनाबाधित रूग्ण आहेत. मृत्यू दरही आटोक्यात आलेला नाही. अशा परिस्थितीत जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेला लॉकडाऊन खूप महत्त्वाचा ठरणार आहे.