जळगाव - लॉकडाऊनमुळे रात्रीच्या शांततेचा फायदा घेऊन पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या 6 दरोडेखोरांच्या मुसक्या यावल पोलिसांनी आवळल्या आहेत. अटक केलेल्या दरोडेखोरांकडून कुऱ्हाड, चाकू, सुरे अशी घातक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींमध्ये मनोज रमेश सपकाळे (वय 20), गोलू उर्फ धम्मरत्न दिगंबर धुरंदर (वय 18), विशाल भाऊलाल साळवे (वय 19), गणेश उर्फ अजय जनार्दन सोनवणे (वय 19), संदीप आत्माराम सपकाळे (वय 21) आणि शिव हरी बागडे (वय 18) यांचा समावेश आहे. हे सर्व आरोपी भुसावळ आणि आजूबाजूच्या परिसरातील रहिवासी आहेत. या आरोपींनी यावल शहरापासून तीन ते साडेतीन किलोमीटर अंतरावर असलेल्या एका पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याचा प्लॅन आखला होता. मात्र, यावल पोलिसांनी त्यांचे मनसुबे उधळून लावले.
बुधवारी मध्यरात्रीनंतर यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण धनवटे हे त्यांच्या सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांसह रात्र गस्तीवर होते. यावल-भुसावळ रस्त्यावर गस्त घालत असताना त्यांच्या पथकाने दरोड्याचा तयारीत असलेल्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी पकडताच त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी आम्ही पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे कबूल केले. पुढील तपास पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनिता कोळपकर करीत आहेत.