जळगाव - जिल्ह्यात रविवारी पुन्हा 4 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या एकूण 18 झाली असून जिल्हा रेड झोनमध्ये आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, आज (रविवारी) कोरोना पॉझिटिव्ह म्हणून समोर आलेले 3 रुग्ण हे अमळनेर शहरातील आहेत. कोरोना संक्रमित असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे, तर 1 रुग्ण भुसावळ येथील आहे. भुसावळमध्येही आतापर्यंत 2 कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
जिल्हा रुग्णालयात कोरोना संशयित म्हणून दाखल करण्यात आलेल्या व्यक्तींचे स्वॅब घेतलेल्यांपैकी 4 रुग्णांचे अहवाल रविवारी सायंकाळी जिल्हा रुग्णालय प्रशासनाला प्राप्त झाले. या चारही रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यापैकी 3 कोरोनाबाधित रुग्ण हे अमळनेर येथील असून 1 भुसावळ शहरातील आहे. अमळनेरातील तिन्ही रुग्ण कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील आहेत. गेल्या आठवडाभरापासून अमळनेर शहरात सातत्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. अमळनेर शहर हे जिल्ह्यातील कोरोनाचे 'हॉट स्पॉट' ठरले आहे. आतापर्यंत अमळनेर शहर तसेच तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 13 इतकी आहे. त्यात एक महिला आणि दोन पुरुषांचे मृत्यू झाले आहेत, तर 10 जणांवर सद्यस्थितीत जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात चौघांचा मृत्यू; 13 रुग्णांवर उपचार सुरू -
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 18 झाली असून, यापैकी 1 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परत गेला आहे. 4 रुग्णांचा मृत्यू झाला असून, उर्वरित 13 रुग्णांवर कोरोना संसर्ग कक्षात उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 18 वर पोहोचल्याने जिल्हा आता रेडझोनमध्ये आला असून लॉकडाऊनची अधिक कडक अंमलबजावणी होणे आवश्यक आहे.